पंतप्रधानांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य टाळली पाहिजेत : शरद पवार

पंतप्रधानांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य टाळली पाहिजेत : शरद पवार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधानपद हे घटनात्मक पद आहे. सरकारी यंत्रणांचे ते प्रतिनिधी आहेत. त्या पदावरील व्यक्तीने जाहीर बोलताना तार्तम्य पाळले पाहिजे. असली, नकलीसारखी वक्तव्ये करण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला? अशी आक्षेपार्ह वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळली पाहिजेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच, जे देशाच्या हिताचे नाही, अशा विचारसरणीबरोबर मी  कधीही जाणार नसल्याचेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. नंदुरबार येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्यास सुचविले होते, या प्रश्नावर पवार म्हणाले, नरेंद्र मोदी हे एखाद्या समाजाचे पंतप्रधान नसून, ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्य करून ते गैरसमज पसरवित आहेत. त्यामुळे देशाच्या ऐक्याला हे घातक आहे. जे देशाच्या हिताचे नाही, ज्या लोकशाहीवर ज्या विचारधारेचा विश्वास नाही, अशा विचारसरणीबरोबर मी कधीही जाणार नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पवार म्हणाले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारधारा ही देशाला एकत्र ठेवणारी, ऐक्याची आहे. त्या विचारानेच आपल्याला पुढे जावे लागेल. मोदी यांची नुकत्याच झालेल्या काही जाहीर सभांमधील भाषणातून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे झाले आहेत. त्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे मोदी अस्वस्थ झाले असावेत. त्यातूनच ती अशी वक्तव्य करीत असावीत, असे पवार यांनी नमूद केले. गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, एससी, एसटी समाजाचे आरक्षण वाढविण्यास आमची हरकत नाही, परंतु एखाद्या समाजाचे अधिकार काढून द्यायला नकोत, असे नमूद केले.
राजकारणात बालबुद्धी
आमदार अशोक पवार यांना अजित पवार यांनी एका सभेत ‘पुन्हा कसा आमदार होतो ते बघतोच’, असे म्हटले. या प्रश्नावर पवार म्हणाले, राजकारणात बालबुद्धी आहेत. अशी अनेक लोक आहेत. बालबुद्धीनं काही बोलत असतील, तर त्यावर काय बोलणार?
सरकारने अपील करावे
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निकाल लागला, त्यावर पवार म्हणाले, न्यायालयाच्या निकालाला इतकी वर्षे लागली, यामुळे आम्ही अस्वस्थ होतो. किमान काही तर निकाल त्यांनी दिलाय. दाभोलकर यांच्या आत्म्याला काही तरी न्याय मिळावा. मुख्य सूत्रधार सुटला त्याबाबत राज्य सरकारने अपील करावी, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा

पदव्युत्तर पदवी वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढल्या..!
Menstruation and Stomach Pain : मासिक पाळी आणि पोटदुखी
प्रेयसीने चाकूने हल्ला केल्याने प्रियकर जखमी