घरगुती हिंसाचार कसा कमी करता येईल?

घरगुती हिंसाचार कसा कमी करता येईल?

– डॉ. प्रदीप पाटील, काऊंसेलर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सांगली

सहन करायला काही मर्यादा आहे की नाही? किती सहन करायचं? आजवर सहन केलं हे चुकलंच माझं, आम्हीच फक्त सहन करायचं? हे शब्द वारंवार अनेक कुटुंबांमध्ये ऐकू येतात. ‘सहन करण्याच्या मर्यादा’ या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. बर्‍याच वेळा जेव्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण स्वतः त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ज्या व्यक्तीबरोबर आपले पटत नाही त्या व्यक्तीशी आपण संपर्क तोडतो. पण, जेव्हा वारंवार न पटणार्‍या व्यक्ती बरोबर व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा कधीतरी स्फोट होतो आणि मग वरील वाक्ये आपण उच्चारत राहतो!
थोडक्यात, त्या व्यक्तीला आपण बदलायला जात नाही, तर आपल्यात आपण बदल करतो आणि म्हणूनच आपल्याला त्याचा त्रास होत असतो. साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण हा त्रास स्वीकारलेला असतो. उदाहरणार्थ, तुमच्या घरातल्या विशिष्ट व्यक्तीच्या टीव्ही बघण्याच्या हट्टापायी तुम्ही तुमच्या आवडत्या सीरियल बघायचे सोडून देता. तुमच्या जोडीदाराचे करिअर महत्त्वाचे आहे, असे तुम्हाला समजले तर तुम्ही घरातील सर्व कामे करू लागता. एखाद्या स्त्रीला तिचे शरीर तिच्या मालकीचे आहे, असे माहिती असताना देखील तिच्या जोडीदाराकडून त्याचा वारंवार विनापरवाना उपभोग घेणे सहन केले जाते, वगैरे.
आपण ज्या वागण्याच्या किंवा दुसर्‍याचे वागणे सहन करण्याच्या मर्यादा तयार करतो. त्यामध्ये आपल्याला आलेल्या अनुभवातून काढलेले निष्कर्ष, आपली मते, आपल्या समजुती, आपले दृष्टिकोन आणि समाजातील व्यवहार हे कारणीभूत ठरतात. यातून आपली एक ‘व्हॅल्यू सिस्टीम’ तयार होते. शारीरिक, मानसिक व भावनिक पातळीवर आपण अशी व्हॅल्यू सिस्टीम तयार केलेली असते आणि चार प्रकारे आपण त्या व्यक्त करतो.
दुसर्‍या व्यक्तींच्या मर्यादांना महत्त्व देऊन आपल्या मर्यादा आपण सोडून देण्याचा एक प्रकार असतो. या प्रकारात त्या व्यक्तीचे शोषण आणि त्याच्यावर अत्याचार होण्याची शक्यता कैक पटीने जास्त असते. दुसर्‍या प्रकारात व्यक्ती स्वतःच्या मर्यादा अंतिम ठरवून दुसर्‍यांना अजिबात किंमत देत नसते. दुसरे जर त्यांच्या मर्यादांना तोडू लागले तर ते टोकाला जाऊन कोणत्याही थराचे कृत्य करू शकतात. या दोघांच्या मध्ये तिसर्‍या प्रकारांचे लोक असतात, जे कधी टोकाला जातात तर कधी स्वतःलाच संपवून टाकतात. चौथा प्रकार जास्त महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. यामध्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या मर्यादा शांत व संयतपणे दाखवून देत कृती करत राहायची याचे उत्तम कौशल्य असणार्‍या व्यक्ती. यामुळे घरगुती हिंसाचार, सामाजिक हिंसा आणि गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणावर कमी कमी होत जाते.
ज्या घरामध्ये पालकांना आपल्या मुलांकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा असतात, तेव्हा ते पालक त्या मुलांसाठी अवघड नियम तयार करून ठेवतात. त्याचबरोबर ज्या घरांमध्ये मुले ही विशिष्ट नियम तयार करूनच जगायचा आग्रह धरतात, तेथेही कुटुंबात संघर्ष तयार होत राहतो. आणि ज्या कुटुंबांमध्ये स्वतःच्या नियमांना बाजूला सारून इच्छा, गरजा, भावना, बाजूला ठेवून दुसर्‍यांना महत्त्व दिले जाते तेथे त्या व्यक्ती सातत्याने अस्थिर अशा मानसिकतेमध्ये राहतात आणि जगतात.
समुपदेशन किंवा कॉन्सेलिंग आणि मनोरोगावर उपचार एवढेच फक्त उपाय नसून, सामाजिक-राजकीय स्थितीही व्यक्तीच्या तयार केलेल्या चांगल्या नियमांना उचलून धरणारी जर असेल, तर समाजातील गुन्हेगारी कमी होण्यास मोठी चालना मिळेल.
हेही वाचा 

Pune Porsche Car Accident : मद्याच्या नशेत तर्र अन्…! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत
Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!
Pudhari Crime Diary : गुन्हेगारांची मानसिकता!, गुन्ह्यांची मालिका!