काँग्रेसचं ठरलं! नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार

काँग्रेसचं ठरलं! नागपुरमधून २८ डिसेंबरला लोकसभेचं रणशिंग फुंकणार

वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेस संघ मुख्यालयी फुंकणार आहे. तीन राज्यातील अनपेक्षित पराभवानंतर महाराष्ट्रातील निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न यातून असणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी,  राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत.याविषयीची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.  नागपूरच्या हॅाटेल ली मेरिडीयन येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री खा. मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना के. सी. वेणुगोपाल  म्हणाले की, देशभरातून काँग्रेस पक्षाचे जनसमर्थन वाढत आहे, नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांच्या मतांमध्ये भरघोस वाढ झाली. कर्नाटकनंतर काँग्रेसने तेलंगणातही स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून देशाची संसदही सुरक्षित राहिलेली नाही तर देश कसा सुरक्षित असेल असा प्रश्न उपस्थित करून लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर आतापर्यंत दोनदा हल्ला झाला आणि दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्षाचेच सरकार होते. संसदेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारले असता, प्रश्न विचारणाऱ्या १४ सदस्यांनाच निलंबित करण्यात आले पण ज्या भाजपा खासदारांकडून या हल्लेखोरांना पास देण्यात आले होते त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली नाही.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, नागपूर मध्ये होणाऱ्या महारॅलीला राज्यभरातून १० लाख लोक उपस्थित राहतील.  लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवरच असल्याने ही महारॅली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम करेल. नागपूरमध्ये होणारी महारॅली ऐतिहासिक व देशात परिवर्तनाचा संकेत देणारी ठरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री प्रदेश व कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री डॉ नितीन राऊत, सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिशन ओझा, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, अमर राजूरकर, नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, अभिजीत सपकाळ आदी नेते उपस्थित होते.