दलित युवकाचा बेदम मारहाणीत मृत्यू; कोंबडा बनण्याची शिक्षा दिली आणि कित्येक तास काठीने मारहाण केल्याचा आरोप

दलित युवकाचा बेदम मारहाणीत मृत्यू; कोंबडा बनण्याची शिक्षा दिली आणि कित्येक तास काठीने मारहाण केल्याचा आरोप

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात एका दलित युवकाला ‘आमच्या दुकानातून दारू का विकत घेत नाही?’ असे विचारत बेदम मारहाण करण्यात आली. या युवकाला अत्यंत कठोर शिक्षा दिली गेली. त्याला कोंबडा बनवण्यात आले आणि बेल्ट व काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना काय आहे आणि युवकाला कधी व कशी मारहाण करण्यात आली याचा हा ग्राउंड रिपोर्ट.

“मी एकटी राहिली. तो माझा लाडका, माझ्या गळ्यातील ताईत, माझं सारं काही होता. मी त्याला लहानाचा मोठा केला होता. माझी इच्छा आहे की एकतर मला फाशी द्या किंवा त्यांना.”

एका झाडाखाली खाटीच्या शेजारी जमिनीवर हात जोडून बसलेल्या, रडत हुंदके देणाऱ्या 65 वर्षांच्या या वृद्ध महिलेचं नाव राधा देवी आहे.

26 वर्षांपूर्वी राधा देवीचे पती हडमान वाल्मिकी यांचे निधन झाले, तेव्हा त्यांचा सर्वांत लहान मुलगा रामेश्वर फक्त सहा दिवसांचा होता. त्यांनी एकट्याने संघर्ष करत रामेश्वरचे संगोपन केले आणि तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार बनला.

14 मे रोजी रामेश्वरची त्याच्या घराजवळ कथितरित्या हत्या करण्यात आली. त्याला जवळपास सहा तास लाठ्यांनी निर्दयीपणे मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

या उतार वयात, थकलेले शरीर, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, आणि मागील दहा दिवसांपासून तापाने त्रस्त राधा देवी आपल्या मुलाच्या खुन्यांना फाशी देण्याची मागणी करत आहेत.

राजस्थानमधील बलौदा गावातील हृदय विदारक घटना :

राजस्थानची राजधानी जयपूरपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर, हरियाणाच्या सीमेच्या जवळ झुंझुनू जिल्ह्यात बलौदा गाव आहे.

गावात पक्क्या रस्त्यापासून निघून सरकारी शाळेच्या शेजारील वाळूच्या वाटेवरून एक किलोमीटर पुढे गेल्यावर एका गल्लीत कोपऱ्यावर एक घर आहे.

या घराच्या चार भिंतींमध्ये, एका झाडाखाली राधा देवी बसलेल्या आहेत.

रामेश्वर वाल्मिकीची आई राधा देवी

रामेश्वर वाल्मिकीची आई राधा देवी

घराच्या मागे काही अंतरावर एक गोशाला आहे, जिथे 26 वर्षीय रामेश्वर साडे नऊ हजार रुपयांवर काम करत होता. घराच्या दुसऱ्या बाजूला सूरजमल यांची एक रिकामी हवेली आहे.

या हवेलीमध्ये रामेश्वरला जवळपास सहा तास काठ्यांनी अत्यंत निर्दयपणे मारहाण करून ठार मारण्यात आले.

आरोपींची दहशत इतकी होती की गावातील अनेकांना त्यांनी मारहाण केली, परंतु कोणालाही तक्रार करण्याचे धाडस झाले नाही.

गावातील 25 वर्षीय मनीष सांगतो, “या गुन्हेगारांनी RBM नावाचे एक गट तयार केले आहे. ते अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहेत आणि बेकायदेशीर कामे करतात.”

“हे आरोपी गावातील कोणालाही मारहाण करतात. त्यांनी गावात खूप दहशत पसरवली आहे.”

घरातील परिस्थिती या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची जाणीव करून देते. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तू घरात उपलब्ध नाहीत. खाटेवर काही भांडी, काही कपडे, आणि बंद पडलेली चूल एवढेच दिसते.

राधा देवी हुंदका आवरत सांगतात, “तो गोशाळेतून घरी आला होता. मी त्याला जेवण करण्यास सांगितले, तर तो म्हणाला, ‘आत्ताच आलो आहे. थोड्या वेळाने जेवतो.’ मग तो थंड पाणी घेण्यासाठी टाकीकडे गेला.”

रामेश्वर यांचं घर बघून त्यांची आर्थिक परिस्थिती कळते

रामेश्वर यांचं घर बघून त्यांची आर्थिक परिस्थिती कळते

त्या सांगतात, “मला दहा दिवसांपासून ताप आहे. मी थोडा आराम करण्यासाठी झोपले होते. बराच वेळ झाला तरी रामेश्वर आला नाही. पाहण्यासाठी गेले तेव्हा गावातील सुभाषने सांगितले की रामेश्वरला दारू विकणारे लोक घेऊन गेले.”

“मी हात जोडून सुभाषला विनंती केली की मला ते कुठे घेऊन गेले आहेत तिथे घेऊन चल. मी स्वतः शोधण्यासाठी गेले, पण माझ्या रामेश्वरला कुठे घेऊन गेले आहेत हे कोणीही सांगितले नाही. थकून मी घरी परतले आणि तीन वाजता खाटेवर झोपले.”

हाताने घराच्या दरवाजाकडे इशारा करत त्या सांगतात, “संध्याकाळी जागे झाल्यावर पाहिले तर रामेश्वर जमिनीवर पडलेला होता. मी रडू लागल्यावर सर्व लोक गोळा झाले. सर्वांनी मला पकडून दरवाजा बंद केला.”

“माझा मुलगा कोणाशी भांडत नसे. माझी दोन मुले कोटपूतली आणि सीकरमध्ये पाच-पाच हजार रुपयांवर मजुरी करतात.”

रडत त्या म्हणाल्या, “माझा रामेश्वरच माझ्या सोबत राहायचा. माझ्या लाडक्या मुलाला का मारले?”

घटनेचा साक्षीदार काय म्हणाला?

रामेश्वरला न्याय मिळवून देण्यासाठी झुंझुनूच्या कलेक्टरला अर्ज देऊन परतलेल्या गावकऱ्यांपैकी एक, जेठूराम, यांनी सांगितले की रामेश्वरबरोबर त्यांनाही जबरदस्तीने उचलून रिकाम्या हवेलीत नेण्यात आले होते.

जेठूराम यांनी सांगितले, “14 मे रोजी सव्वा बारा वाजता मी सरकारी हॉस्पिटलमधून औषधे घेऊन येत होतो. रामेश्वर गावातील टाकीतून पाणी भरत होता. आम्ही एकत्र होतो.”

“दारूचे दुकानदार आले आणि आम्हाला मोटरसायकलवर बसवून जबरदस्तीने सूरजमलच्या हवेलीत घेऊन गेले. त्यांनी हवेलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर मला उठाबशा काढायला लावल्या आणि कोंबडा बनवले.”

ते पुढे सांगतात, “तिथे पाच लोक होते. त्या पाचही व्यक्तींनी शंभर-शंभर फटके मारण्याची भाषा केली. रामेश्वरला हात बांधून वर टांगलं. त्याच्याला कधी पायावर, कधी जमिनीवर लोळवून अतिशय निर्दयपणे काठीनं मारहाण करत होते.”

“त्यातील एक व्हिडिओ बनवत होता. त्यांना कोणतीही भीती नव्हती. संध्याकाळी जवळपास सहा वाजेपर्यंत ते मारहाण करत होते. त्यांनी रामेश्वरला खूप निर्दयीपणे मारलं.”

ते सांगतात, “रामेश्वरचा तिथेच मृत्यू झाला होता. रामेश्वर बेशुद्ध आहे असं समजून ते जेव्हा त्याला घेऊन गेले, त्यावेळेस संधी मिळताच मी हवेलीतून पळून आलो.”

जेठूराम सांगतात, “मारहाण करताना ते बोलत होते की आम्ही वीस लाख रुपये देऊन दारूचा परवाना मिळवला आहे. तुम्ही लोक आमच्या दुकानातून दारू विकत घ्या. या सर्वांना फासावर लटकवलं पाहिजे.”

मारहाणीनंतर, रामेश्वरला हरियाणात घेऊन गेले.

झुंझुनू जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राजर्षी राज वर्मा यांनी बीबीसीला सांगितलं, “मारहाण केल्यानंतर, जेव्हा रामेश्वर बेशुद्ध झाला, तेव्हा आरोपी त्याला जवळच्याच हरियाणातील सतनाली मधील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. रस्त्यातच रामेश्वरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, त्यांनी मृतदेह बलौदा गावातील त्याच्या घरी आणला आणि तिथून ते फरार झाले होते.”

रामेश्वर वाल्मीकी आणि इतर एका व्यक्तीला या हवेलीत बंद करून मारहाण करण्यात आली होती

रामेश्वर वाल्मीकी आणि इतर एका व्यक्तीला या हवेलीत बंद करून मारहाण करण्यात आली होती

गावातील मुकेश सांगतात, “संध्याकाळी जवळपास साडे सहा वाजता मी दुकानातून सामान घेऊन येत होतो. रामेश्वरच्या घराजवळ गाडीत ते पाच तरुण होते. त्यांनी मला हाक मारल्यावर मी घाबरलो.”

“त्यांनी मला सांगितलं की याला गाडीतून उतरव. हा बेशुद्ध झाला आहे. याच्या घरच्यांना कळव. मी घाबरत घाबरत त्याला गाडीतून उतरवलं आणि घराकडे निघून आलो. मी त्या लोकांना घाबरून रामेश्वरला गाडीतून उतरवलं होतं. रामेश्वरच्या अंगावर कपडे नव्हते.”

रामेश्वरच्या भावानं काय सांगितलं?

रामेश्वरचा मोठे भाऊ, कालूराम, कोटपूतलीमध्ये राहून मजुरी करतो. घटनेची माहिती मिळताच ते घरी आले आहेत.

ते सांगतात, रामेश्वर गौशाळेत काम करण्याबरोबरच डफली वाजवायची. गावातील एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर रामेश्वरला डफली वाजवण्यासाठी बोलावलं जायचं. तो अतिशय हसतमुख होता आणि त्याला नाचणं, गाणं आवडायचं.”

कालूराम कंठ दाटून आलेल्या आवाजात सांगत होता, “मी कोटपूतली मध्ये रामेश्वरच्या लग्नाचं बोलणं करत होतं. मात्र इकडे ही घटना घडली.”

रामेश्वर आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या गोशाळेत जवळपास चार वर्षांपासून काम करत होता.

गोशाळेत काम करणाऱ्या संतोष सांगतात, “तो खूप चांगला मुलगा होता. तो खूप गाणी म्हणायचा आणि हसतमुख असायचा. आम्ही सकाळी पाच वाजताच कामावर यायचो. आम्ही इथे चारा घालणे आणि साफ सफाईचं काम करतो.”

रामेश्वरची आठवण काढून संतोष रडू लागतात. त्यांच्याच दारूच्या दुकानातून दारू विकत घेण्याचा दबाव

सूरजगड पासून बलौदा गावात येण्याच्या मुख्य रस्त्यावरच गावात दारूचं दुकान आहे. राजस्थान सरकारच्या अबकारी विभागाकडून या दारूच्या दुकानाचा घेण्यात आलेला परवाना सुशील कुमार या बलौदा गावातील व्यक्तीच्या नावावर आहे.

मात्र सुशील कुमारनं हे दारूचं दुकान चालवण्यासाठी बेकायदेशीपणे आरोपी चिंटूला दिलं होतं. चिंटू गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरुद्ध सूरजगड पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गावकऱ्यांनी आपल्याच दारूच्या दुकानावरून दारू विकत घ्यावी यासाठी चिंटू गावकऱ्यांना धमकवायचा आणि मारहाण करायचा.

बलौदा ग्रामपंचायत आहे. गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभे असणारे कालू शर्मा सांगतात, “वीस दिवस आधी याच लोकांनी जीतू आणि पवन यांनादेखील मारहाण केली होती आणि मला देखील कोंबडा होण्यास सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या दारूच्या दुकानावरून दारू विकत घ्या.”

कालू शर्मा सांगतात, “या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी आता त्या तरुणाला मारून टाकलं आहे, उद्या ते आणखी कोणाला तरी मारतील.”

पोलिस अधीक्षक राजर्षी राज वर्मा म्हणतात की “चौकशीत आरोपींनी सांगितलं आहे की रामेश्वर देशी दारू प्यायचा. आरोपी दारूच दुकान चालवायचे, त्यामुळे त्यांना या गोष्टीचा राग होता की तो त्यांच्या दुकानातून दारू का विकत घेत नाही. याच कारणामुळे त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.” “आम्ही हातपाय जोडले, पाया पडलो मात्र त्यांनी सोडलं नाही”

जेठू यांचा मुलगा मनीष सांगतो, “मी एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे लोकांनी सांगितलं की माझे वडील आणि रामेश्वर यांना घेऊन गेले आहेत. ते ऐकताच आम्ही जेवण अर्धवट सोडून पळालो.”

“मी आणि माझी पत्नी हवेलीत गेलो. तिथे माझ्या वडिलांना कोंबडा बनवण्यात आलं होतं. रामेश्वरचे हात बांधलेले होते. काठी आणि बेल्टने त्याला मारहाण करण्यात येत होती. मी आणि माझी पत्नीनं त्यांना हात जोडून सांगितलं, त्यांच्या पाया पडलो. मात्र त्यांनी सांगितलं की तुम्ही आता जा, यांना आम्ही थोड्या वेळानं सोडू.”

मनीष सांगतो, “मी गावातील लोकांकडे मदत मागण्यासाठी गेलो. मात्र सगळ्यांनीच सांगितलं की सूरजगडला पोलिसांकडे जा. मात्र पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची माझी हिंमत झाली नाही. मला भीती वाटत होती की पोलिसांकडे गेलो तर हे लोक काय करतील.”

तो पुढे सांगतो, “माझ्या वडिलांना त्यांनी धमकी देखील दिली की जर आमच्याविरुद्ध जबाब नोंदवलास तर तुला गोळी घालू. त्यानंतर माझ्या वडिलांना हवेलीतून सोडण्यात आलं होतं.”

गोशाळेत काम करणाऱ्या संतोष म्हणतात, “तो अकरा वाजता घरी गेला होता. दुपारी तीन वाजता मला कळालं की दारूचं दुकानवाले रामेश्वरला घेऊन गेले आहेत. मी अनेक लोकांना फोन करून सांगितलं की चला आपण त्याला सोडवून आणू. मात्र सोबत येण्यास कोणीही तयार झालं नाही.”

टार्गेट पूर्ण न झाल्यास अबकारी विभाग करतो दंड

राजस्थानचा अबकारी विभाग वेगवेगळ्या दारूच्या दुकानांना एका निश्चित गॅरंटीत म्हणजे ठराविक रकमेची दारू विकण्याचं टार्गेट देतो. जर त्या रकमेपेक्षा कमी रकमेची दारूविक्री झाली तर तो विभाग दारू दुकान मालकावर दंड आकारतो.

झुंझुनू जिल्हा अबकारी अधिकारी अमरजीत सिंह यांनी सांगितलं की “बलौदा गावातील दारूच्या दुकानांसाठी वर्षाची पन्नास लाख रुपयांची गॅरंटी आहे. मात्र त्यांनी पन्नास लाख रुपयांची दारू विक्री करायची आहे. म्हणजेच विभागाच्या नियमानुसार जर दारू दुकानदार वर्षभरात पन्नास लाख रुपयांच्या दारूची विक्री करू शकला नाही तर त्याच्यावर दंड आकारण्यात येतील.”

आरोपी चिंटू बलौदा गावात परवाना नसताना बेकायदेशीर पद्धतीनं दारूचं दुकान चालवत होता. यावर कारवाई का करण्यात आली, असं विचारल्यावर अमरजीत सिंह म्हणतात, “आम्हाला याबद्दल माहिती नव्हती.”

ते सांगतात की, “ज्याच्या नावावर परवाना होता त्यानेदेखील संबंधित विभागाला याबद्दल सांगितलं नव्हतं. मात्र आता तीन दिवसांसाठी दारूचं दुकान बंद करण्यात आलं आहे आणि परवाना रद्द करण्यासाठी कारवाई केली जाते आहे.”

पोलिसांची कारवाई

या तीन आरोपींनी बलौदा गावात बेकायदेशीरपणे घरं बांधली आहेत असं सांगत 23 मे ला संध्याकाळी प्रशासनानं त्यावर बुलडोझर चालवला होता.

झुंझुनू जिल्हा पोलिस अधिक्षक राजर्षी राज वर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की “घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जिल्ह्यातून स्पेशल टीम तयार करून 48 तासांमध्येच मुख्य आरोपींना अटक करण्यात आली.”

“या प्रकरणात सहा मुख्य आरोपी आहेत. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आणखी एका आरोपीवरदेखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यालादेखील लवकरच अटक केली जाईल. हा आरोपी तिथे हजर होता मात्र थेटपणे तो घटनेत सामील नव्हता.”

पोलिस अधिक्षक वर्मा यांचं म्हणणं आहे की राजस्थान पोलिस हे प्रकरण गांभीर्यानं हाताळते आहे आणि लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाईल.

Add Comment