अंडरवर्ल्डमध्ये दाऊद खिलाडी, तर इक्बालला अनाडी का म्हणतात?

“नरेंद्र राठोड, ठाणे” image=”http://”][/author] कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर ठाणे शहरातील ठाणेनगर पोलिस ठाण्यात दोन, तर कासारवडवली पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. या तीन गुन्ह्यांपैकी ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात इकबालची ठाणे न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली …

अंडरवर्ल्डमध्ये दाऊद खिलाडी, तर इक्बालला अनाडी का म्हणतात?

“नरेंद्र राठोड, ठाणे” image=”http://”][/author]
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर ठाणे शहरातील ठाणेनगर पोलिस ठाण्यात दोन, तर कासारवडवली पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. या तीन गुन्ह्यांपैकी ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात इकबालची ठाणे न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. 3 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा तसेच खंडणी उकळणे आदी कलमानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व चकमक फेम पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे होता.
इक्बाल विरोधातील हा गुन्हा गोराई येथील जमीन प्रकरणी सेटलमेंट करण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता. उत्तर मुंबईत राहणार्‍या तक्रारदार यांची गोराई येथे 38 एकर जमीन आहे. या जमीन मालकाने ही जमीन एका व्यक्तीस 2014 मध्ये विक्री केली होती. त्या बदल्यात मूळ जमीन मालकाने खरेदीदाराकडून 2 कोटींची अनामत रक्कमदेखील स्वीकारली होती; मात्र काही दस्तऐवज नसल्यामुळे या जमिनीचा पूर्ण व्यवहार होऊ शकला नाही व त्या जमिनीची नोंदणीदेखील होऊ शकली नाही. दस्तऐवजाच्या अडचणीमुळे या जमिनीची नोंदणी दोन वर्षे रखडली.
याच दरम्यान दोन वर्षानंतर आपण विक्री केलेल्या जमिनीचे भाव दुप्पट-तिप्पटीने वाढल्याचे मूळ जमीन मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्या जमीन मालकाने आपला हा जमिनीचा सौदा रद्द करण्याचे ठरवले. मात्र, जमीन घेणार्‍या व्यक्तीने आपण जमिनीचा व्यवहार केला असून, त्या बदल्यात 2 कोटींची अनामत रक्कम देखील दिल्याचे सांगत जमीन खरेदीचा हट्ट धरला होता. दरम्यान इक्बालने या जमिनीच्या व्यवहारात हस्तक्षेप करत जमीन घेणार्‍या पहिल्या खरेदीदारास धमकावत त्यास जमिनीचा व्यवहार रद्द करण्यास भाग पाडले होते. जमिनीचा पहिला व्यवहार रद्द करण्याच्या बदल्यात कासकरने जमीन मालकाकडून 1 कोटींची खंडणी घेतली. पहिल्या खरेदीदाराने दिलेली 2 कोटींची अनामत रक्कमदेखील कासकर यानेच हडपली होती, असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले होते.
या व्यवहारात हस्तक्षेप करत जमीन मालकाकडून खंडणी उकळण्यासाठी इक्बालने छोटा शकिलची मदत मागितली होती. मात्र, छोटा शकिलने इक्बाल यास मदत करण्यास नकार दिला होता. त्यानंतर इक्बालने हे प्रकरण अनिस इब्राहिमच्या कानावर टाकले व अनिसने संबंधित जमीन मालकास फोन करून धमकी दिली व इक्बाल यास तीन कोटींची खंडणी देण्यास भाग पाडले. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी थेट इक्बालच्या मुंबईतील नागपाडा येथील घरात घुसून त्यास बेड्या ठोकल्या होत्या, तर या गुन्ह्यात दाऊद इब्राहिम व अनिस इब्राहिम या दोघांना देखील आरोपी केले होते.
दरम्यान, याच घटनेनंतर छोटा शकील व अनिस यांच्यात वाद झाल्याचीदेखील माहिती पुढे आली होती. त्यानंतर छोटा शकील यानेच मुंबईतील आपल्या हस्तकांमार्फत गोराई जमीन खंडणी प्रकरणाची टीप ठाणे पोलिसांपर्यंत पोहोचवल्याची देखील त्यावेळी चर्चा होती. दरम्यान, या सार्‍या प्रकरणात इक्बालला झालेली अटक दाऊद गँगसाठी मोठा धक्का देणारी घटना होती. पोलिसांनी इक्बाल विरोधात 1 हजार 650 पानांची जम्बो चार्जशीट मोक्का विशेष न्यायालयात दाखल केली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांनी ज्या तत्परतेने इक्बालला अटक केली, त्या तत्परतेने त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यावर भर दिला नाही. नुसती अटक करून प्रसिद्धी मिळवण्यापूरतेच ही अटक मर्यादित राहिली. त्याचाच परिणाम म्हणजे ठोस पुराव्याअभावी न्यायालयात पोलिसांची बाजू कमकुवत पडली. त्याचा फायदा इक्बालला झाला व तो कायद्याच्या चौकटीतून निसटला.
‘एक खिलाडी, एक अनाडी!’
इक्बाल कासकरला ड्रग्जचं व्यसन असून तो त्याविना राहूच शकत नाही असं वारंवार पुढे आले आहे. इक्बालच्या ड्रग्जच्या व्यसनामुळेच खुद दाऊददेखील त्याच्यावर नाराज होता. म्हणूनच दाऊदचा सख्खा भाऊ असूनदेखील इक्बालला त्याच्या डी कंपनीत फारसं महत्त्वाचं स्थान कधीच मिळालं नाही. दाऊदचे नाव घेतले तरी भलेभले बिल्डर, व्यापारी हादरतात. कारण, तो त्याच्या कामात अत्यंत माहीर आहे.
तो कधी कुठे आणि कोणाला फोन करेल याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. दाऊदला अंडरवर्ल्डमध्ये खिलाडी म्हणून ओळखतात. त्याचा सख्खा भाऊ इक्बाल मात्र सार्‍या अंडरवर्ल्डमध्ये अनाडी म्हणून ओळखला जातो. इक्बाल नशेच्या पूर्ण आहारी गेलेला असल्याने त्याच्याशी आपण कुठलाही गोष्टी बोलत नसल्याचा खुलासा ठाणे पोलिसांकडे दाऊदचा खास हस्तक अहमद लंगडाने चौकशी दरम्यान केला होता. मात्र, आपण पाकिस्तानात छोटा शकिलशी बोलत असतो असे लंगडा पोलिसांना चौकशी दरम्यान म्हणाला होता. लंगडा हा दाऊद कंपनीचा पीआरओ म्हणून ओळखला जायचा.
हेही वाचा 

Pudhari Crime Diary : ज्या साडीत पांडबाचा जीव अडकला, तिच साडी त्याच्या गळ्याभोवतीचा फास बनून गेली
Pudhari Crime Diary : पत्नीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याचं संशयाचं भूत! अन् चौघांच्या आयुष्याची राखरांगोळी
Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!