ते घटनेची तोडमोड करतील !

ते घटनेची तोडमोड करतील !

धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी घटनेत परिवर्तन करण्याची विरोधी पक्षाच्या आघाडीची योजना आहे. त्यामुळे दलित, आदीवासी आणि अन्य मागासवर्गीय यांचे आरक्षण धर्माच्या आधारावर विशिष्ट लोकांना वाटले जाईल. त्यामुळे या देशातील बहुसंख्याक समाजाच्या नागरीकांवर दुय्यम दर्जाचे नागरीक म्हणून राहण्याची वेळ येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील घोशी येथे ते रविवारी एका प्रचारसभेत भाषण करीत होते. त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीवर कडाडून टीका केली. या दोन्ही पक्षांनी दशकानुदशके पूर्वांचल भागाकडे दुर्लक्ष केले आहे. हा भाग या पक्षांनी माफिया, गरीबी आणि असहाय्यता यांना आदंण दिला आहे. हे दोन्ही पक्ष हिंदू धर्मातील जातींना एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्यास उद्युक्त करीत आहेत. अशा प्रकारे हिंदू धर्मातील जाती एकमेकींशी भांडून दुर्बळ व्हाव्यात, अशी या दोन्ही पक्षांची इच्छा आहे. अशा दुर्बळ झालेल्या जाती आपल्या आश्रयाला आल्या की त्यांच्या साहाय्याने आपण सत्तेवर येऊ शकू अशी त्यांची भावना आहे. खऱ्या विकासाच्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष हटविण्यासाठी हे दोन्ही पक्ष अशा प्रकारे कार्यरत आहेत. पण लोकांनी त्यांचे कारस्थान ओळखलेले आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाला त्याच्या कामांमुळे विजय मिळणार आहे, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामर्थ्यवान सरकारची आवश्यकता
सारे जग भारतातील लोकसभा निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहे. या देशाला जितके अधिक बळकट सरकार मिळेल आणि जितका अधिक सामर्थ्यवान नेता मिळेल तितके जगात भारताचे महत्व वाढणार आहे. याउलट दुर्बळ आणि अस्थिर सरकारमुळे देशाचे महत्व घसरण्याची भीती आहे, अशीही मांडणी त्यांनी केली.