जिनिव्हा टेनिस स्पर्धेत रुड विजेता

जिनिव्हा टेनिस स्पर्धेत रुड विजेता

वृत्तसंस्था/ जिनिव्हा
एटीपी टूरवरील येथे झालेल्या जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या सातव्या मानांकित कास्पर रुडने एकेरीचे जेतेपद पटकाविताना झेकच्या टॉमस मॅकहेकचा पराभव केला.
सुमारे पावणेदोन तास चाललेल्या अंतिम सामन्यात कास्पर रुडने मॅकहेकचा 7-5, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत झेकच्या मॅकहेकने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला उपांत्य सामन्यात पराभवाचा धक्का दिला होता. कास्पर रुडने 2021 आणि 2022 साली जिनिव्हा टेनिस स्पर्धा यापूर्वी जिंकली आहे.  25 वर्षीय कास्पर रुड आता रविवारपासून सुरू झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. कास्पर रुडने इटलीच्या कोबोलीचा 1-6, 6-1, 7-6(7-4) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. जिनिव्हा स्पर्धेमध्ये जोकोविचला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत कास्पर रुडचा सलामीचा सामना ब्राझीलच्या अल्वेसबरोबर तर झेकच्या मॅकहेकचा सलामीचा सामना पोर्तुगालच्या नुनो बोर्जेसबरोबर होणार आहे.