युरोपीय महासंघ निवडणुकीत उजव्या विचारसरणीची सरशी

युरोपीय महासंघ निवडणुकीत उजव्या विचारसरणीची सरशी

जॉर्जिया मेलोनींच्या पक्षाच्या जागा दुप्पट : फ्रान्सच्या अध्यक्षांचा मोठा पराभव
वृत्तसंस्था/ ब्रसेल्स
युरोपीय महासंघ निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी अनेक देशांच्या सत्तारुढ पक्षांना मोठे नुकसान पोहोचविले आहे. रविवारी झालेल्या युरोपीय महासंघाच्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी मोठे यश मिळविले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही या निवडणुकीत पिछेहाट पत्करावी लागली आहे. एकूण 27 सदस्य देश असलेल्या युरोपीय महासंघात सत्तेची चावी उजव्या विचारसरणी असलेल्या पक्षांच्या हाती गेली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाच्या युरोपीय महासंघाच्या संसदेतील जागा दुप्पट झाल्या आहेत.
जर्मनीतील उजव्या विचारसरणीचा पक्ष ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ला भले स्वत:च्याच उमेदवारांशी निगडित घोटाळ्यांना सामोरे जावे लागले तरीही पक्षाने देशाचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांच्या ‘सोशल डेमोक्रेट्स’ पार्टीला मात देण्याकरता पुरेशा जागा जिंकल्या आहेत. उजव्या विचारसरणीचा प्रभाव ओळखून  युरोपीय महासंघ आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांचा पक्ष ‘क्रिश्चियन डेमोक्रेट्स’ने निवडणुकीपूर्वीच स्थलांतरित आणि हवामान बदलाच्या मुद्द्यावर अधिक कठोर भूमिका स्वीकारली होती, यामुळे 720 सदस्यीय युरोपीय संसदेत त्यांचा पक्ष आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष म्हणून कायम राहण्यास यशस्वी ठरला आहे.
फ्रान्सकडून संसद विसर्जित
रविवारी झालेल्या युरोपीय संसदेच्या निवडणुकीत फ्रान्समध्ये मैरीन ले पेन यांच्या ‘नॅशनल रॅली’ पार्टीने  स्वत:चा दबदबा कायम केला, यामुळे मॅक्रॉन यांनी राष्ट्रीय संसदेला त्वरित विसर्जित करत मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे. मॅक्रॉन यांच्यासाठी ही मोठी राजकीय जोखीम आहे, कारण त्यांच्या पक्षाला अधिक नुकसान सहन करावे लागू शकते. ले पेन यांनी हे आव्हान स्वीकारत आम्ही देशाला बदलण्यासाठी तयार आहोत, फ्रान्सच्या हितांच्या रक्षणासाठी तयार आहोत. मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितांच्या समस्येला संपविण्यास तयार आहोत असे म्हटले आहे.
मॅक्रॉन यांनी मान्य केला पराभव
मॅक्रॉन यांनी स्वत:च्या पक्षाचा दारुण पराभव मान्य केला आहे. मी जनादेश स्वीकारत आहे. लोकांच्या चिंतांची जाणीव झाली असून त्या दूर केल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. अचानक निवडणुकीची घोषणा करणे केवळ माझी लोकशाहीवरील श्रद्धा अधोरेखित करते असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. युरोपीय महासंघाच्या 27  सदस्यीय देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जर्मनीत ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’च्या अनेक वरिष्ठ उमेदवारांचे नाव घोटाळ्यांमध्ये सामील होते, तरीही या पक्षाची मतांची टक्केवारी वाढली आहे. पक्षाने 2019 मध्ये 11 टक्के मते प्राप्त केली होती. हे प्रमाण आता वाढून 16.5 टक्के झाले आहे. तर जर्मनीतील सत्तारुढ आघाडीत तीन पक्षांची एकत्रित मतांची हिस्सेदारी 30 टक्क्यांच्या आसपास राहिली आहे. युरोपीय महासंघाची निवडणूक ही भारतानंतरची जगातील सर्वात मोठी निवडणूक मानली जाते.