दूषित पाण्याच्या दुष्परिणामांची जनजागृती करा

दूषित पाण्याच्या दुष्परिणामांची जनजागृती करा

जि. पं. सीईओंकडून अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : ग्रामीण भागात दूषित पाण्याच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी भित्तीपत्रके व डब्ल्यूक्यूएमआयएस पॅकेट हँडबुक प्रकाशित करण्यात आले आहे. शुक्रवारी जिल्हा पंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना राहुल शिंदे म्हणाले, दूषित पाण्यामुळे मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. याविषयी प्रत्येक ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात व्यापक जागृती करावी. ग्रामीण पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा विभागाने जागृतीसाठी भित्तीपत्रके व हँडबुक तयार केली आहेत. जिल्हा पातळीवरही त्यांची छपाई करून प्रत्येक ग्राम पंचायतीला वितरीत करावीत. नागरिकांनी दूषित पाण्याचे सेवन करू नये, याविषयी त्यांना सतर्क करण्याची सूचना त्यांनी केली.
दूषित पाण्याच्या सेवनामुळे नागरी वस्त्यांमध्ये अनेक आजार फैलावत आहेत. ते रोखण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे, पाणी साठवण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, कूपनलिका रिचार्ज करणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे, वारंवार पाण्याची गुणवत्ता तपासणे, जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेल्या बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेचे वॉटर ट्रिटमेंट प्लांट प्रत्येक दोन महिन्यांतून स्वच्छ करणे, एक ग्राम योजनेतील ओव्हरहेड टँक महिन्यातून एकदा स्वच्छ करणे आदींविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारप्पन्नवर, ग्रामीण पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा विभागाचे कार्यकारी अभियंते शशिकांत नायक यांच्यासह जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन योजनेचे अधिकारी उपस्थित होते.