आंध्रप्रदेश, ओडिशामध्ये उद्या शपथविधी सोहळा

आंध्रप्रदेश, ओडिशामध्ये उद्या शपथविधी सोहळा

पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित
वृत्तसंस्था/ हैदराबाद
नुकत्याच विधानसभा निवडणूक झालेल्या आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये बुधवार, 12 जून रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा  शपथविधी होणार आहे. या सोहळ्याला नुकतीच पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले नरेंद्र मोदी दोन्ही राज्यांमध्ये उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी 12 जूनला सकाळी आंध्रप्रदेशला जाणार आहेत. तेथे दुपारी साडेअकरा वाजता शपथविधी समारंभ होणार आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यानंतर पंतप्रधान मोदी ओडिशा राज्य सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ओडिशा सरकारचा शपथविधी सोहळा 12 जून रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही शपथविधी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजप पूर्ण बहुमताने सरकार बनवत आहे. अशा स्थितीत भाजपने मोठ्या जल्लोषात शपथविधी सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. राजधानी भुवनेश्वरला सजवण्यात आले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा देखील शपथविधी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आंध्रात एनडीए, ओडिशात भाजप
आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने बाजी मारली आहे. राज्यात टीडीपी, भाजप आणि जनसेना पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या. निकालात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला राज्यातील विधानसभेच्या 174 जागांपैकी 135 जागा मिळाल्या आहेत. तर जनसेना पक्षाने 21 तर भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत. आता चंद्राबाबू नायडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. त्याचबरोबर ओडिशात भाजपने पाचवेळचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मोठा धक्का देत विधानसभा निवडणुकीत 147 पैकी 78 जागा जिंकून इतिहास रचला आहे.