राजस्थानची पराभवाची मालिका कायम

राजस्थानची पराभवाची मालिका कायम

पंजाब किंग्जचा 5 गड्यांनी दणदणीत विजय : सामनावीर सॅम करनचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
कर्णधार सॅम करनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर प्ले ऑफमधून बाहेर झालेल्या पंजाबने राजस्थानचा पाच विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 9 बाद 144 धावा केल्या. यानंतर राजस्थानने दिलेले 145 धावांचे आव्हान पंजाबने पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. पंजाबकडून कर्णधार सॅम करनने नाबाद 63 धावांची खेळी केली. या विजयासह गुणतालिकेत नववे स्थान मिळवले. मुंबई इंडियन्स दहाव्या क्रमांकावर घसरला आहे.
सॅम करनचे नाबाद अर्धशतक
राजस्थानने दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात पंजाबला धक्का दिला. त्याने प्रभसिमरन सिंहला 6 धावांवर बाद केलं. राइले रॉस्यू 22 धावा करून बाद झाला. अनुभवी जॉनी बेयरस्टो सपशेल अपयशी ठरला. तो 22 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. शशांक सिंह भोपळाही फोडू शकला नाही. पंजाबने अवघ्या 48 धावांत चार फलंदाज गमावले होते. पण कर्णधार सॅम करन यानं एकाकी झुंज दिली. कर्णधार सॅम करन आणि उपकर्णधार जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 63 धावांची भागीदारी झाली. जितेश शर्मा 22 धावा करून बाद झाला. सॅम करन 41 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 63 धावा करून नाबाद राहिला. आशुतोष शर्मानं नाबाद 17 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानकडून आवेश खान आणि युझवेंद्र चहलनं 2-2 बळी घेतले.
राजस्थानचा पुन्हा पराभव
गुवाहाटीच्या मैदानावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय अंगलट आला. राजस्थानच्या फलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट फेकल्या. रियान पराग आणि आर. अश्विन यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानची सुरुवातच खराब झाली. फॉर्मात असलेला यश्सवी जैस्वाल चार धावा काढून तंबूत परतला. यानंतर मात्र राजस्थानची फलंदाजी अतिशय संथ झाली. राजस्थानच्या फलंदाजांना धावा काढतानाही संघर्ष करावा लागला. कोडमोर 23 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. तर संजू सॅमसनला 15 चेंडूत 18 धावा काढता आल्या. यावेळी राजस्थानची 3 बाद 42 अशी स्थिती झाली होती.
यावेळी रियान परागने आर.अश्विनच्या साथीने राजस्थानच्या डावाला आकार दिला. रियान पराग आणि अश्विन यांनी 34 चेंडूमध्ये 50 धावांची भागीदारी केली. परागने शानदार फलंदाजी करताना 34 चेंडूत 48 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार ठोकले. अश्विनने 19 चेंडूमध्ये एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी करत परागला चांगली साथ दिली. अश्विनला अर्शदीप सिंगने बाद केले. अश्विन बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलनेही लगेच विकेट फेकली. जुरेलला खातेही उघडता आले नाही. रोवमन पॉवेलला राहुल चहरने चार धावांवर तंबूत धाडले. डेवोन फरेराला इम्पॅक्ट पाडता आला नाही. तो आठ चेंडूत सात धावा काढून तंबूत परतला. बोल्टने 12 धावांचे योगदान दिले. रियान परागच्या शानदार खेळीमुळे राजस्थानला 20 षटकांत 9 बाद 144 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून राहूल चहर, सॅम करन व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग व नॅथन एलिस यांना एक एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 9 बाद 144 (यशस्वी जैस्वाल 4, टॉम केडमोर 18, संजू सॅमसन 18, रियान पराग 34 चेंडूत 48, आर. अश्विन 28, ध्रुव जुरेल 0, रोव्हमन पॉवेल 4, ट्रेंट बोल्ट 12, सॅम करन, राहुल चहर व हर्षल पटेल प्रत्येकी दोन बळी).
पंजाब किंग्ज 18.5 षटकांत 5 बाद 145 (प्रभसिमरन सिंग 6, बेअरस्टो 14, रॉस्यू 22, शशांक सिंग 0, सॅम करन 41 चेंडूत नाबाद 63, जितेश शर्मा 22, आशुतोष शर्मा नाबाद 17, आवेश खान व चहल प्रत्येकी दोन बळी).
प्लेऑफमधील गणिते बदलण्याची शक्यता
दिल्लीने लखनौला पराभूत केल्यामुळे राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले. पण त्यांना लागोपाठ चौथ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे प्लेऑफमधील गणिते बदलण्याची शक्यता आहे प्लेऑफआधी राजस्थानच्या संघासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. शेवटचे दोन सामने जिंकत राजस्थानला 20 गुणासह अव्वलस्थान पटकावण्याची नामी संधी होती पण पंजाबविरुद्ध सामना गमावल्याने त्यांना शेवटचा सामना जिंकल्यास 18 गुणांवरच समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हैदराबादचे अद्याप दोन सामने बाकी असल्याने त्यांना 18 गुणाच्या जोरावर दुसरे स्थान पटकावण्याची संधी आहे. याशिवाय, त्यांचा नेट रनरेट सध्यातरी चांगला आहे.