प्रचंड गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली

प्रचंड गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली

चारधाम यात्रेत भाविकांची विक्रमी संख्या : 25 तासांपासून लोक अडकलेले : दर्शनाच्या प्रतीक्षेत 11 भाविकांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ उत्तरकाशी
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेत यंदा प्रचंड संख्येत भाविक पोहोचत आहेत. यादरम्यान यमुनोत्री धाम येथे दर्शन सुरू झाल्यापासून भाविकांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.  गंगोत्री-यमुनोत्री धामच्या ठिकाणी विक्रमी गर्दीमुळे शासकीय व्यवस्था कोलमडली आहे. दोन्ही धामांसाठी हरिद्वार येथून निघाल्यास 170 किलोमीटर अंतरावरील बरकोटपर्यंत 45 किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी दिसून येणार आहे. बरकोट येथूनच यमुनोत्री आणि गंगोत्रीसाठी मार्ग आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने भाविकांचे हाल होत आहेत. तेथून उत्तरकाशीचा मार्ग वन-वे आहे, याचमुळे मंदिरातून परतणाऱ्या वाहनांना प्रथम सोडले जात आहेत, तर मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सुमारे 20-25 तासांनी पुढे जाण्याची संधी मिळत असल्याचे चित्र आहे. स्थिती सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत.
चारधाम यात्रेदरम्यान आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 5 जणांचा मृत्यू मंगळवारी झाली आहे. तर तीन जणांनी वाहनातच अखेरचा श्वास घेतला आहे. मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक होते. तर यातील 4 जणांना मधूमेहासह रक्तदाबाची समस्या होती असे गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी बुधवारी सांगितले आहे. ऑफलाइन भाविक स्वत:ला प्राप्त तारखेपूर्वी प्रवास करत असल्याने ही कोंडी निर्माण झाल्याचा दावा विनय शंकर यांनी केला आहे.
प्रचंड गर्दी पाहता 15 आणि 16 मेसाठी चारधाम यात्रेची ऑफलाइन नोंदणी प्रशासनाने बंद केली आहे. तर वेबसाइटवरील नोंदणीसाठी 22 जूननंतरची तारीख उपलब्ध होण्याची शक्यता आहे. गर्दी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येमुळे भाविकांना मार्गात ठिकठिकाणी रोखण्यात आले आहे.
व्यवस्था कोलमडली
गंगोत्री जाताला उत्तरकाशीपासून 20 किलोमीटर पुढे गेल्यावर लोकांना थांबावे लागत आहे. तेथे आरामासाठी कुठलीच सोय नाही. आसपासच्या गावातील लोक पाण्याची बाटली 30-50 रुपये तर शौचालयाच्या वापरासाठी 100 रुपये आकारत आहेत. स्थानिकांकडून लूट होत असल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. गंगोत्री मार्गावर 6 दिवसांपासून जाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, ओडिशा आणि दिल्लीच्या 7 हजार भाविकांनी पुढील यात्रा स्थगित करणेच श्रेयस्कर मानले आहे. परंतु केदारनाथ आणि बद्रीनाथच्या मार्गावर वाहतूक कोंडी तुलनेत कमी आहे. तेथे मंगळवारी 23 हजार लोकांनी दर्शन घेतले आहे.
26 लाख लोकांची नोंदणी
मागील वर्षी 28 मेपर्यंत यमुनोत्रीमध्ये 12,045 तर गंगोत्रीमध्ये 13,670 भाविकच पोहोचले होते. तर यंदा मंगळवारी दिवसभरात 27 हजार भाविक यमुनोत्रीत दाखल झाले. भाविकांच्या प्रचंड संख्येमुळे रस्त्यांवर कोंडी निर्माण झाली आहे. आतापर्यंत 26.73 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये 1.42 लाखाहून अधिक लोकांनी ऑफलाइन नोंदणी केली असल्याची माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांनी दिली आहे. यात्रा सुरू होऊन सध्या केवळ 4 दिवस झाले असून यात्रा नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. अनेक लोक नोंदणीशिवाय पोहोचत आहेत. तर शासकीय व्यवस्था 2023 च्या भाविकांच्या संख्येच्या आधारावर करण्यात आली होती.