युक्रेन रशियातल्या प्रदेशांवर हल्ले करण्याची तयारी करतोय का?

युक्रेन रशियातल्या प्रदेशांवर हल्ले करण्याची तयारी करतोय का?

रशियाच्या आतल्या भागातील स्थळांवर हल्ले करायला आता युक्रेनला पाश्चिमात्य शस्त्रांचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे रशिया – युक्रेन युद्धात काय बदलेल? त्याचा युक्रेनवर काय परिणाम होईल? आतापर्यंत युक्रेनला त्यांच्याकडील पाश्चिमात्य देशांनी पुरवलेली शस्त्रं ही फक्त त्यांच्या भूभागातल्या लष्करी लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठी वापरता येत होती.

 

यामध्ये क्रायमिया आणि रशियाने ताबा मिळवलेल्या इतर भूभागांचाही समावेश होता. नाटोमधल्या देशांनी पुरवलेल्या शस्त्रांनी जर युक्रेनने सीमेपलिकडे (रशियामध्ये) हल्ले केले तर त्यामुळे संघर्ष वाढेल अशी भीती असल्याने आतापर्यंत युक्रेनला अशाप्रकारचे सीमेपलिकडचे हल्ले पाश्चिमात्य शस्त्रं वापरून करण्यावर बंदी होती.

पाश्चिमात्य अस्त्रं वापराचं धोरण का बदललं?

युक्रेनच्या ईशान्येकडील खारकीव्ह भागामध्ये रशिया पुढे सरकल्यानंतर मात्र युक्रेनच्या मित्र राष्ट्रांनी हा निर्णय बदलला. स्वतःचं रक्षण करताना युक्रेनला सीमेपलिकडील लष्करी टार्गेट्सचा वेध घेता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

 

गेल्या महिन्यात रशियाने युक्रेनच्या खारकीव्ह भागामध्ये जमिनीवरून हल्ला चढवला. एका नवीन बाजूने हल्ला करत रशियाने इथली काही गावंही ताब्यात घेतली आहेत. खारकीव्ह हे युक्रेनमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असून ते सीमेपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. रशियाचं या भागात पुढे सरकणं हा खारकीव्हसाठी मोठा धोका आहे.

 

या भागातली बॉर्डर ही आता फ्रंट लाईन – युद्ध सुरू असलेली सीमा आहे. पण आतापर्यंत सीमेपलिकडची टार्गेट्स युक्रेनला लक्ष्य करता येत नसल्याने रशियन सैन्याला या भागात शिरणं सोपं गेलं.

 

युक्रेन आणि इतर युरोपीयन देशांकडून दबाव वाढल्यानंतर अमेरिकेने आता त्यांचं धोरण बददलं आणि युक्रेनला सीमेपलिकडे रशियामधल्या टार्गेट्सना लक्ष्य करण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी दिलेली अस्त्रं वापरण्याची परवानगी देण्यात आली.

 

शुक्रवारी 31 मे रोजी झालेल्या नाटोच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट अँटनी ब्लिंकन म्हणाले, “युद्धभूमीवर प्रत्यक्षात काय सुरू आहे आणि युक्रेनला ज्या गोष्टींची, ज्या वेळी गरज असेल त्यावेळी गरज पडेल त्याप्रमाणे धोरणांमध्ये बदल करणं, जुळवून घेणं हे महत्त्वाचं आहे.”

 

धोरण बदलाचा परिणाम काय होऊ शकतो?

युक्रेनला पाश्चिमात्य लांब पल्ल्याच्या अस्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिली तर ‘सॅनिटरी झोन्स’ (बफर झोन्स) वाढवण्याची धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.

 

पुतिन म्हणाले होते, “युरोपातल्या नाटो राष्ट्रांनी हे लक्षात ठेवावं की त्यांचे देश लहान आकाराचे आणि लोकसंख्येची घनता जास्त असणारे आहेत. रशियाच्या भूमीत आतवर येणाऱ्या हल्ल्यांबद्दल चर्चा करताना त्यांनी ही बाब लक्षात ठेवावी.”

 

अशाच प्रकारचा तणाव वाढणं टाळण्यासाठी कदाचित अमेरिकेने युक्रेनला रशियामध्ये हल्ल्याची परवानगी देताना त्यात त्यांच्या ATACMS (आर्मी टॅक्टाईल मिसाईल सिस्टीम)सारख्या लांब पल्ल्याच्या अस्त्रांचा समावेश केलेला नाही.

 

या क्षेपणास्त्रांचा पल्ला 300 किलोमीटर्सचा आहे आणि रशियन भूभागातले लष्करी तळ आणि हवाई तळांवर हल्ला करण्यासाठी याचा वापर होऊ शकला असता.

 

पण या क्षेपणास्त्रांच्या वापरावर निर्बंध असल्याने युक्रेनला त्यांच्या सीमेजवळच्या टार्गेट्सनाच लक्ष्य करता येईल. पण युक्रेनच्या मुख्य मित्र देशांच्या दृष्टीने हा देखील एक मोठा धोरणात्मक बदल आहे.

 

कारण लहान पल्ल्याची – 70 किलोमीटर्सपर्यंतचा पल्ला असणारी HIMARSसारखी मल्टीपल रॉकेट लाँचर्स रशियाचं दळणवळण आणि सैन्याची हालचाल यामध्ये मोठा अडथळा निर्माण करू शकतात. यामुळेच त्या बाजून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांचा वेगही कमी होईल.

 

युक्रेनच्या ईशान्येकडील भागामधील लष्करी कारवाई सांभाळणाऱ्या खारकीव्ह टॅक्टिकल ग्रुपचे युरिय पोवख म्हणतात, “आता युक्रेनला अशा जागी हल्ले करता येतील जिथे युक्रेनवर हल्ले करण्यासाठी शत्रूचं सैन्य, उपकरणं-अवजारं आणि पुरवठा साहित्य गोळा करण्यात आलेलं आहे.”

 

युक्रेनवर आणखी एक हल्ला करण्यासाठी रशिया खारकीव्हपासून फक्त 90 किलोमीटर अंतरावर सैन्य जमा करत असल्याचं काही दिवसांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं.

 

इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ वॉरनेही उपग्रह छायाचित्रांचा अभ्यास करून हे म्हटलं होतं, की ‘त्या भागातील डेपो आणि गोदामांमधल्या हालचाली वाढलेल्या’ आहेत. त्यामुळेच या जागांवर हल्ले करता येण्याची क्षमता मिळाल्याने युक्रेनच्या लष्कराची ताकद वाढेल आणि त्यांना या भागातले हल्ले परतवायला मदत होईल.

 

युक्रेनला या बदलाचा फायदा होईल का?

पाश्चिमात्य अस्त्रांच्या वापरावरची बंदी उठलेली असली तरी त्याचा फायदा युक्रेनला रशियाच्या KAB ग्लाईड बॉम्बपासून संरक्षण करण्यासाठी होणार नाही. या बॉम्बचे परिणाम भयानक असतात आणि रशिया खारकीव्ह आणि सीमेजवळच्या इतर भागांमध्ये कायम अशा बॉम्बचा वापर करतं. या बॉम्बचे हल्ले थांबवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे हे विनाशकारी KAB टाकणारी विमानं युक्रेनियन सैन्याला टार्गेट करावी लागतील.

 

युक्रेनकडे असणारी अमेरिकची पेट्रिऑट (Patriot) नावाची एअर डिफेन्स सिस्टीम हे युक्रेनकडे असणारं एकमेव शस्त्र आहे जे या विमानांना लक्ष्य करू शकतं. पण हे अस्त्र खारकीव्हच्या जवळ नेण्यात मोठा धोका आहे. हेरगिरी करणारी ड्रोन्स ही यंत्रणा पटकन टिपतील आणि ही महागडी यंत्रणा नष्ट करण्यासाठी मॉस्को त्यावर Iskander मिसाईल डागण्याची शक्यता आहे.

 

युके आणि फ्रान्सने मिळून तयार केलेली क्षेपणास्त्रं – Storm Shadow air-launched cruise missiles (Scalp) युक्रेनला दिलेली आहेत. आणि या क्षेपणास्त्राच्या वापराबद्दल त्यांनी युक्रेनवर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. या क्षेपणास्त्रांचा पल्ला आहे 250 किलोमीटर्सचा.

 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांना सांगितलं, “ज्या ठिकाणांहून क्षेपणास्त्रं डागली जात आहेत, म्हणजे असे लष्करी तळ जिथून युक्रेनवर हल्ला होतोय, तिथे हल्ला करण्याची (युक्रेनला) परवानगी द्यायला हवी.”

 

हे विधान म्हणजे स्टॉर्म शॅडो (Scalps) वापरण्याची परवानगी असल्यासारखं आहे, असं नाव न सांगण्याच्या अटीवर एका लष्करी अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं. त्यांच्या मते याचा अर्थ म्हणजे आता युक्रेन त्यांच्या सीमेजवळच्या रशियाच्या कुर्स्क आणि बेलगोरोड भागांतील हवाई तळांवर हल्ले करू शकतं.

 

पण अशा मोहिमांमधून मर्यादित गोष्टी साध्य होतील. युक्रेनकडील ज्या सुखोई 24 विमानांमध्ये ही क्रूझ मिसाईल्स आहेत, त्यांना ती डागण्यासाठी रशियन बॉर्डरच्या जवळ जावं लागेल. आणि या प्रयत्नांत रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम या विमानांना टिपण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी F-16 जेट्स अधिक योग्य आहेत, पण ती युक्रेनला या वर्षअखेरीस मिळणार आहेत. पण रशियाच्या आत असणाऱ्या तळांवरील हल्ल्यांसाठी या जेट्सचा वापर करण्याची परवानगी युक्रेनचे सहयोगी देश देतील का, हे अजून स्पष्ट नसल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं.

 

रशियाच्या आतल्या बाजूला असणाऱ्या तळांवरील हल्ल्यांसाठी युक्रेनचं लष्कर स्वतःची अस्त्रं विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहे. सीमेपासून शेकडो किलोमीटर्सवर असणाऱ्या लष्करी तळ आणि ऑईल डेपोंवर त्यांनी विकसित केलेल्या काही ड्रोन्सनी हल्ला केला होता.

 

युक्रेनच्या सीमेपासून 1800 किलोमीटरवर असणाऱ्या ओर्स्क शहरातल्या लांब पल्ल्याच्या रडार स्टेशनवर नुकताच हल्ला करण्यात आला होता.

 

Published By- Priya Dixit

 

 

Go to Source