सांकवाळ येथे 27 रोजी पंतप्रधानांची महासभा

सांकवाळ येथे 27 रोजी पंतप्रधानांची महासभा

50 हजारांपेक्षा जास्त उपस्थितीची अपेक्षा
पणजी : भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु असून मतदारांच्या वाढत्या प्रतिसादासह अनेक समाजसंस्था व अन्य घटकांचाही पाठिंबा लाभत आहे, त्यामुळे  भाजपचे बळ वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दि. 27 रोजी गोवा भेटीवर येत असून सांकवाळ येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता बिर्ला मंदिराच्या समोरील खुल्या जागेत ही सभा होणार असून दक्षिण गोव्यातून 50 हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहतील, अशी माहिती खासदार सदानंद तानावडे यांनी दिली. ही सभा यशस्वी करण्यासाठी मुरगाव तालुक्यातील तिन्ही आमदार अर्थात माविन गुदिन्हो, कृष्णा (दाजी) साळकर आणि संकल्प आमोणकर यांच्यासह कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी काम सुरू केले आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही उमेदवार श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपो यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांना विविध समाजांचे समर्थनही लाभत आहे. त्यात वैश्य महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदींचा समावेश आहे. त्यासंबंधी आपली समर्थन पत्रे त्यांनी सुपूर्द केली आहेत, अशी माहिती तानावडे यांनी दिली. गृहमंत्री अमित शहा यांची सभा रद्द करण्यात आलेली नसून मोदी यांच्या सभेनंतर ती आयोजित करण्यात येईल. तसेच प्रदेश भाजपचा जाहीरनामा येत्या 29 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तानावडे यांनी दिली.