अखेर मूल्यांकन परीक्षा मार्गी

अखेर मूल्यांकन परीक्षा मार्गी

रंगोत्सव साजरा करून विद्यार्थी परीक्षेला हजर
बेळगाव : मागील दोन आठवड्यांपासून रखडलेल्या मूल्यांकन परीक्षेला सोमवारपासून पुन्हा सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात रंगोत्सवाचा आनंद लुटत विद्यार्थ्यांनी दुपारी मूल्यांकन परीक्षेला हजेरी लावली होती. बससेवा बंद असल्याने पालकांनाच शाळांपर्यंत सोडावे लागले. 11 मार्चपासून पाचवी, आठवी व नववी वर्गांच्या मूल्यांकन परीक्षांना सुरुवात झाली. परंतु, उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने परीक्षा तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे मूल्यांकन परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. इतर वर्गांच्या परीक्षा पूर्ण झाल्या तरी मूल्यांकन परीक्षांबाबत अंतिम निर्णय येत नसल्याने विद्यार्थ्यांची घालमेल वाढली होती. परीक्षांच्या कालावधीतच मूल्यांकन परीक्षा घेऊन पूर्ण करण्याची मागणी पालकांमधून जोर धरत होती. मागील आठवड्यात उच्च न्यायालयाने परीक्षेवरील स्थगिती उठविल्याने मूल्यांकन परीक्षेचा मार्ग मोकळा झाला होता. परीक्षा मंडळाकडून मूल्यांकन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार सोमवारी पाचवीचा परिसर अध्ययन तर आठवी व नववी वर्गाचा तृतीय भाषा पेपर झाला. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर का होईना, परीक्षेला सुरुवात झाल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पालकांची तारांबळ
बेळगाव शहरासह उपनगर व तालुक्यातील काही गावांत सोमवारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. दुपारपर्यंत रंगोत्सवाचा उत्साह सुरू होता. यातून वाट काढत विद्यार्थी व पालकांना शाळांपर्यंत पोहोचावे लागेल. ज्या पालकांकडे खासगी वाहने आहेत, त्यांना शाळेपर्यंत सोडणे सोपे झाले. परंतु, ज्यांच्याकडे वाहने नाहीत, त्यांना मात्र तारेवरची कसरत करत रिक्षा व इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला.