निवडणूक काळात आतापर्यंत 16 कोटींचा मुद्देमाल जप्त

निवडणूक काळात आतापर्यंत 16 कोटींचा मुद्देमाल जप्त

रोकड, दारु, दागिने, महागड्या वस्तूंचा समावेश : आयकर, अबकारी विभागाची कामगिरी
पणजी : लोकसभा निवडणुका असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, बेकायदा दारूची तस्करी, नियमबाह्य पैशांची देवाण-घेवाण होऊ नये, सोने-चांदी यांचे काळे व्यवहार असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्यातील विविध तपास यंत्रणांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 16 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील विविध तपास यंत्रणांनी तब्बल 16 कोटींहून अधिक ऊपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. गोव्यात 16 मार्चपासून ते सोमवारी 22 एप्रिल या काळात राज्यातील विविध तपास यंत्रणांनी तब्बल  16 कोटी 65 लाख 52 हजार 572 ऊपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये रोकड, अमलीपदार्थ, मद्य साठा, सोने-चांदी यांसारखे मौल्यवान धातू तसेच अन्य मोफत वाटण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचा समावेश आहे. कारवाई केलेल्या विविध तपास यंत्रणांमध्ये रेल्वे पोलीस, एनसीबी, सीमा शुल्क, अबकारी खाते, पोलीस खाते, आयकर आणि व्यावसायिक कर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
आयकर, अबकारी विभागाची कामगिरी
राज्याच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तम सेवा बजावताना 4.6 कोटींची रोख रक्कम आणि 3.03 कोटी ऊपयांचे मौल्यवान धातू जप्त केले आहेत. निवडणूक काळात सर्वाधिक उलाढाल होणाऱ्या अबकारी खात्याने 3.43 कोटी किंमतीचे 62 हजार 949 लीटर मद्य जप्त करून बेकायदा होणारा मद्यसाठ्यावर रोख लावली आहे.
पोलीस खातेही दक्ष
निवडणुका जाहीर झाल्या की, पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेत आणखी भर पडते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सेवा बजावताना पोलीस खात्यानेही आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न सोडता 2.46 कोटी ऊपयांचे अमलीपदार्थ, 74 लाख ऊपयांचे 30 हजार 546 लीटर मद्य, सुमारे 9 लाखांची रोकड विविध ठिकाणाहून जप्त केली आहे.
व्यावसायिक कर विभाग तपासात पुढे
निवडणूक काळात मतदारांना आमिषे दाखवून मोफत वस्तू देण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी व्यावसायिक कर विभागाने आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर सोडली नाही. निवडणूक काळात मोफत वस्तू देऊन भूलविणाऱ्यांवर वचक ठेवताना व्यावसायिक कर विभागाने तब्बल 1.35 कोटी ऊपयांच्या मोफत तसेच अन्य वस्तू जप्त केल्या आहेत.