चीनमध्ये अमेरिकेच्या 4 शिक्षकांवर चाकू हल्ला

चीनमध्ये अमेरिकेच्या 4 शिक्षकांवर चाकू हल्ला

भरदिवसा पार्कमध्ये झाला हल्ला : जखमी शिक्षकांवर उपचार सुरू
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या जिलिन शहरात अमेरिकेच्या 4 महाविद्यालयीन शिक्षकांवर चाकू हल्ला झाला आहे. हल्ल्यात शिक्षिकेसह सर्व जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेच्या आयोवा प्रांतातील कॉर्नेल कॉलेजमधून आलेले सर्व शिक्षक एका सार्वजनिक उद्यानात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात असून यात जखमी शिक्षक दिसून येतात. या प्रकरणाची माहिती मिळाली असून घडामोडींवर आम्ही नजर ठेवून आहोत असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकेचे शिक्षक चीनच्या बेइहुआ युनिव्हर्सिटीसोबत एका भागीदारी कार्यक्रमाच्या अंतर्गत चीनमध्ये पोहोचले होते. कॉर्नेल कॉलेजच्या प्रशासनाने हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व शिक्षकांच्या संपर्कात असल्याचे सांगत त्यांना आवश्यक मदत पुरविली जात असल्याची माहिती दिली. जखमी शिक्षकांमध्ये माझा भाऊ डेव्हिड जॅबनर देखील सामील आहे. डेव्हिड दुसऱ्यांदा चीनच्या दौऱ्यावर गेला होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत असे आयोवा प्रांताचे प्रतिनिधी एडम जॅबनर यांनी सांगितले.
चाकू हल्ल्यांचे प्रमाण अधिक
चीनमध्ये हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. तेथे बंदुकांच्या वापरावरून कठोर नियम आहेत. परंतु देशात चाकू हल्ल्याच्या अनेक घटना घडत असतात. यापूर्वीही चीनमध्ये अनेकदा सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच शाळा, रुग्णालये आणि उद्यानांमध्ये चाकू हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. मे महिन्यात युनान प्रांतातील एका रुग्णालयात झालेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला होता. तर 21 जण जखमी झाले होते.