भारत उत्पादन क्षेत्रात अग्रेसर राहणार

भारत उत्पादन क्षेत्रात अग्रेसर राहणार

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली  :
सरकारचे लक्ष तरुणांसाठी मजबूत पाया तयार करण्यावर आणि सेमीकंडक्टर्स, टेलिकॉम आणि मॅन्युफॅक्चरिंगसारख्या क्षेत्रांमध्ये भारताला नेतृत्व प्रदान करण्यावर असेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. याबाबतचे नियोजन सरकारने केलेले आहे. मंत्री वैष्णव यांनी मंगळवारी सकाळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. इलेक्ट्रॉनिक्स निकेतन कॉम्प्लेक्समध्ये वैष्णव यांच्यासोबत राज्यमंत्री जितिन प्रसादही उपस्थित होते.
‘आम्हाला देशातील तरुणांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा एक मजबूत पाया तयार करायचा आहे. असा पाया जो देशाला केवळ जगासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहण्यास सक्षम नाही, तर सेमीकंडक्टरसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्येही आघाडीवर राहिल. आगामी काळात दूरसंचार आणि उत्पादनातही अव्वल कामगिरी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाद्वारे लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. विशेषत: जनधन खाते आणि आधार यासारख्या उपक्रमांतून हा बदल दिसून आला आहे. ‘देशाने मोदी सरकारला तिसऱ्यांदा आशीर्वाद दिले असून पुढे जाऊन प्रत्येक सामान्य नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
आयटी क्षेत्र मोदी 2.0 मध्ये केले मजबूत
मोदी 2.0 मध्ये भारत देशाने इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, डेटा गोपनीयता, इंटरनेट नियमन, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता  यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून मजबुत असे काम केले आहे.
पुढील योजना कोणती
आगामी काळात पाहता स्थानिक मूल्यवर्धन वाढवणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक व्यापक फ्रेमवर्क तयार करण्यावर भर देणार असल्याचेही मंत्री वैष्णव यांनी यावेळी नमूद केले.