11 कोटी रुपयांमध्ये पुस्तकाची खरेदी

11 कोटी रुपयांमध्ये पुस्तकाची खरेदी

100 वर्षे जुने पुस्तक
अनेक लोकांना पुस्तकांच्या वाचनाचा छंद असतो. यामुळे हे लोक पसंतीचे पुस्तक त्वरित खरेदी करतात. परंतु कधीकधी पुस्तकाच्या किमतीवर लक्ष द्यावे लागते, विशेषकरून पुस्तकाची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये असल्यास विचार करावाच लागतो. अलिकडेच एका उद्योजकाला 100 वर्षे जुने पुस्तक ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे कळले. यावर त्याने हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खर्च केलेली रक्कम पाहता त्यातून एक आलिशान बंगला खरेदी केला जाऊ शकतो. अमेरिकेच्या इडाहोमध्ये राहणारे 44 वर्षीर रसेल ब्रनसन हे उद्योजक आहेत. त्यांना ई-बेवर एक पुस्तक दिसले, याचे नाव द लॉ ऑफ सक्सेस होते. हे पुस्तक अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांच्याकडून 1925 मध्ये लिहिले गेले होते. सुमारे 100 वर्षे जुन्या या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवर नेपोलियन यांची स्वाक्षरी होती. याचीच ऑनलाइन विक्री होत असल्याचे पाहून रसेल यांनी ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकाची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्सपेक्षा (11 कोटी रुपयांपेक्षा अधिक) अधिक होती.
सुमारे 1 महिन्यापर्यंत रसेल यांनी पुस्तकविक्रेत्याशी मोलभाव केला आणि स्वत:च्या पत्नीचीही समजूत काढली. एका पुस्तकासाठी एवढी मोठी रक्कम करण्यास त्यांच्या पत्नीचा विरोध होता. रसेल यांना यापुढे आणखी काही खरेदी करता येणार नसल्याचे पत्नीने बजावले आहे. रसेल यांना पुस्तकवाचनाचा मोठा छंद आहे. याचमुळे त्यांना हे पुस्तक खरेदी करण्याचा मोह टाळता आला नाही.
खासगी विमानातून आणले घरी
नेपोलियन हिल यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांचा संग्रहही प्राप्त झाल्याचे कळल्यावर रसेल यांना मोठा आनंद झाला. रसेल यांनी या पुस्तकांच्या खरेदीसाठी एकूण 18 कोटी रुपये खर्च केले आहेत. या पुस्तकाला धुळीपासून वाचविण्यासाठी त्यांनी ते खासगी विमानातून आणले आहे.