सात कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ

सात कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दहापैकी सात आघाडीवरच्या कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 67 हजार 259 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढले आहे.
मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजाराला सोमवारी आणि शुक्रवारी दोन दिवस सुट्टी होती. त्यामुळे शेअर बाजारचे काम फक्त तीन दिवस चालले होते. दरम्यान मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 819 अंकांनी किंवा 1.12 टक्के इतका वाढला होता. सोमवारी होळीनिमित्त आणि शुक्रवारी गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजार बंद होता.
कोणत्या कंपन्या आघाडीवर
शेअर बाजारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या दिग्गज कंपनीच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 45 हजार 262 कोटी रुपयांची वाढ झाली असून भांडवल 20 लाख 14 हजार 10 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यासोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 5533 कोटी रुपयांनी वाढून 6 लाख 71 हजार 666 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतीय जीवन विमा क्षेत्रातील कंपनी एलआयसी चे बाजार भांडवल मूल्य 5218 कोटी रुपयांनी वाढून 5लाख 78 हजार 484 कोटी रुपयांवर पोहोचले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवलसुद्धा 4132 कोटी रुपयांनी वाढ दर्शवत 7 लाख 69 हजार 542 कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 4029 कोटी रुपयांनी वाढत 11 लाख 184 कोटी रुपयांवर तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 2819 कोटी रुपयांनी वाढून 5 लाख 32 हजार 946 कोटी रुपयांवर पोहोचले होते. या तुलनेमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल मात्र 10691 कोटी रुपयांनी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. इन्फोसिसच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 4163 कोटींची घसरण झाली आहे.