पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

पूरग्रस्त गावांची जिल्हाधिकारी-जि. पं. सीईओंकडून पाहणी : जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारीची उपाययोजना
बेळगाव : येत्या पावसाळ्यातील संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती तयारी केली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे. यंदा समाधानकारक मान्सूनचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन अनेक गावे पाण्याखाली जातात. विशेषत: नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होतो. यासाठी प्रशासनाने काळजी केंद्र, पूरग्रस्तांना वैद्यकीय उपचार आणि सेवकांची व्यवस्थाही केली जाणार असल्याचे सांगितले. पूरपरिस्थितीत नागरिकांना आणि जनावरांना सुरक्षितस्थळी हलविणे गरजेचे असते. दरम्यान काळजी केंद्रांमध्ये नागरिकांची रवानगी करावी लागते. यासाठी प्रशासनाने योग्य ती तयारी चालविली आहे.
जिल्ह्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, मार्कंडेय, मलप्रभा नदीकाठावरील गावांना पुराचा धोका उद्भवतो. यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीकाठावरील हिंडलगा, सुळगा, उचगाव, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, होनगा, काकती परिसराला पुराचा धोका बसतो. तर खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीकाठावरील गावांना पुराचा धोका उद्भवतो. विशेषत: गावांचा संपर्कही तुटतो. पूरपरिस्थितीत सरकारी शाळा आणि शासकीय इमारतींचा काळजी केंद्रांसाठी वापर केला जाणार आहे. पूरपरिस्थितीत नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतर करण्यासाठी स्वयंसेवकांची  टीम तयार केली जाणार आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून औषधांची व्यवस्थाही केली जाणार आहे. याबाबत आरोग्य खात्यालाही सूचना करण्यात आल्या आहेत. विशेषत: जनावरांच्या संरक्षणासाठी गोशाळांची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय योग्य चारासाठाही उपलब्ध केला जाणार आहे. याबरोबरच पूरपरिस्थितीत नागरिकांची ने-आण करण्यासाठी बोटची व्यवस्था केली जाणार आहे.
जलाशयांतील पाणीपातळी घटली
गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत नदी, नाले कोरडे पडले आहेत. जलाशयांतील पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे जूनमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. जुलैनंतर पावसाचा जोर वाढल्यास पूर येण्याची शक्यता आहे. विशेषत: निपाणी, चिकोडी, कागवाड आदी भागातील पूर आणि अतिवृष्टीचा सामना कशा प्रकारे करावा, यासाठी मोठे प्रयत्न असणार आहेत.