सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात मोफत प्रवेश

सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात मोफत प्रवेश

दोन वर्षांत 132 जणांनी घेतला प्रवेश
बेळगाव : सीमाभागातील 865 गावांमधील विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने मोफत व सवलतीच्या दरात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना अत्यंत कमी खर्चात अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. सीमाभागासाठी विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमाला 10 टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. तसेच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती प्रा. डॉ. जगन कराडे यांनी दिली. मंगळवारी बेळगावमधील संत तुकाराम सांस्कृतिक सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सीमाभागासाठी असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती दिली. पहिल्या वर्षी सीमाभागातील 44, दुसऱ्या वर्षी 88 विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. अनुदानित अभ्यासक्रमांना 100 टक्के फी माफ असून विनाअनुदानित अभ्यासक्रमांना 25 टक्के सवलत दिली जाते. तसेच कमवा व शिका या योजनेतून होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. कविता वड्राळे यांनी विद्यार्थी व पालकांना प्रवेश कशा पद्धतीने करावा, या विषयीची माहिती दिली. दहावीपर्यंत किमान मराठी विषय असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मागील 15 वर्षांपासून संबंधित विद्यार्थी सीमाभागातील रहिवासी असावा. काही अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य सरकारने प्रवेश परीक्षा निश्चित केली असून त्यानंतर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेतून एमएस्सी पूर्ण केलेला विद्यार्थी महांतेश कोळूचे यानेही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. कविता वड्राळे, डॉ. उदय पाटील, नवनाथ वलेकर, डॉ. संतोष सुतार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुष हावळ यांनी केले. यावेळी बेळगाव परिसरातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.