आमदार राजू सेठ यांच्याकडून महांतेशनगरची पाहणी

आमदार राजू सेठ यांच्याकडून महांतेशनगरची पाहणी

नागरी सुविधांचा घेतला आढावा
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मंगळवारी महांतेशनगर परिसरातील आश्रय कॉलनी, खुसरो कॉलनी या परिसरातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी गटारी, रस्ते व कचरा व्यवस्थापन यांची माहिती घेतली. काही ठिकाणी समस्या असून त्या त्वरित सोडविण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरी सुविधांबाबत आमदार सेठ यांनी नागरिकांशी संवाद साधला. काही ठिकाणी गटारी तुंबल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. तसेच रस्ता व पाण्याच्या व्यवस्थेविषयी पाहणी केली. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच गटारीत कचरा टाकणे बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कचरा उचल करण्यासाठी महापालिकेचे वाहन परिसरात येत नसेल किंवा कचरा उचलण्यास नकार देण्यात येत असेल तर हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन आमदार राजू सेठ यांनी केले.