काँग्रेसच्या वास्तूमध्ये दोष, मुख्य प्रवेशद्वार बंद

काँग्रेसच्या वास्तूमध्ये दोष, मुख्य प्रवेशद्वार बंद

मध्यप्रदेश काँग्रेसमधील अजब प्रकार : पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना रोखण्याचा उपाय
वृत्तसंस्था /भोपाळ
मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचा काळ सुरू झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी प्रदेश कार्यालयातील कथित वास्तूदोष पाहता प्रवेशद्वार बंद करविले आहे. तर एक दुसरे प्रवेशद्वार खुले केले आहे. यावर उपरोधिक टीका करत भाजपने दोष पूर्ण काँग्रेसमध्येच असल्याचे म्हटले आहे. पटवारी यांनी बुधवारीच प्रदेश काँग्रेस कार्यालयाची पाहणी केली होती. काँग्रेस मुख्यालयात वास्तू दोष असल्याचे राज्य काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मानणे आहे. याचमुळे प्रदेशाध्यक्ष पटवारी हे वास्तू दोष निराकरणासाठी प्रयत्न करत आहेत. येथील मुख्य द्वार बुधवारपर्यंत खुले होते, परंतु गुरुवारी ते बंद करत दुसरे प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. मध्यप्रदेश काँग्रेसमधील अनेक नेते, ज्यात आमदार आणि खासदारासमवेत कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना रोखण्यासाठी काँग्रेसने आता ही नवी युक्ती शोधली आहे. काँग्रेसमध्येच पूर्ण वास्तू दोष आहे, परंतु तो दूर करण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये वास्तू दोष शोधत असल्याची उपरोधिक टिप्पणी भाजप नेते नरेंद्र सलूजा यांनी केली आहे. जीतू पटवारी यांच्या निर्देशावर प्रदेश काँग्रेस कार्यालयाचे नेहमी बंद राहणारे द्वार खुले करण्यात आले आहे. तर मुख्य द्वारावर टाळे ठोकण्यात आले आहे. यापूर्वी कमलनाथ यांनी काँग्रेस भवनमधील वास्तू दोष करण्याचा प्रयत्न करत तेथे अनेक बदल करविले होते. यामुळे काँग्रेस 116 वरून 66 आमदारांवर आला. आता पटवारी यांच्या या प्रयत्नांनंतर काँग्रेस पूर्णपणे रिकामी होईल, केवळ तेच पक्षात राहतील अशी खोचक टिप्पणी सलूजा यांनी केली आहे.