लातूर : अहमदपूर-शिरूर राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक कोसळून युवक ठार

लातूर : अहमदपूर-शिरूर राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक कोसळून युवक ठार

चाकूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : गावाच्या नावाचे किलोमीटर अंतर व दिशादर्शक दाखवणारा फलक कोसळून एका तरूणाचा शनिवारी (दि.८) जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अहमदपूर शिरूर ताजबंद राष्ट्रीय महामार्गालगत बालाजी मंदिराजवळ सायंकाळच्या सुमारास  घडली. ज्ञानेश्वर बालाजी साके असे या तरूणाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर हा तरूण चाकूर तालुक्यातील आष्टा या गावाचा असून तो चापोली येथे एमएसईबीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. अहमदपूरला कार्यालयीन कामानिमित्त मोटारसायकल क्रमांक (MH-20 BH 7701) जात असताना शिरुर ताजबंद अहमदपूर रोडवरील महादेववाडी पाटीजवळ अवकाळी पावसात सोसाट्याचा वारा सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलक ज्ञानेश्वरच्या अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर साके हा तरूण सामान्य कुटुंबातील असून त्यांच्या पाठीमागे आई,वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेने चाकूर व अहमदपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
कंत्राटदारावर कारवाई करा, नागरिकांची मागणी
या राष्ट्रीय महामार्गाचे नुकतेच काम पूर्ण झाले असून संबंधित कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. दिशादर्शक फलक कोसळून ज्ञानेश्वर साके या तरुणांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूस जबाबदार ठरलेल्या या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.