धाराशिव : महामार्गाच्या गलथान कारभारामुळे अणदूरकरांचे लाखोचे नुकसान

धाराशिव : महामार्गाच्या गलथान कारभारामुळे अणदूरकरांचे लाखोचे नुकसान

अणदूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : तुळजापूर तालुक्यातील अणदूर व परिसरात शनिवारी (दि.८) सायंकाळी पहिल्याच पावसाने सलग ३ ते ४ तास जोरदार झोडपून काढल्याने शेतीसह गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अणदूर महामार्गशेजारील येथील सर्व्हिस रोड व नाल्याचे काम न केल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ शेजारी वत्सलानगर (भुजबळ प्लॉट) परिसरातील नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
सोलापूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्क्रियतेमुळे अणदूरकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. महामार्गशेजारील देशमुख वस्ती ते अणदूर बसस्थानक दरम्यान साईड रोडचे काम एका कंपनी कडून करण्यात आले. सर्व्हिस रोडच्या बाजूला नाले करण्यात आल्या नाही. पुर्वी पाणी वाहणाऱ्या छोटे- मोठे नाले भुजवले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यालगत असलेल्या अनेक घरामध्ये गेल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. घरातील संसार उपयोगी साहित्य खराब झाल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
महामार्ग रुंदीकरणात अणदूर येथील बसस्थानक ते देशमुख वस्ती दरम्यान दोन्ही बाजूस नाले करण्यात येणार होती. मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्याने व नालीची रुंदी अपुरी असल्याने याचाच फटका शेजारील घरांना, दुकानांना बसला असून काम करणाऱ्या कंपनी वरती सरकारने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नाल्यांसह पुलाचे काम अपुरे
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात पावसाचे पाणी व गावातील सांडपाणी जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या अनेक पुलांचे काम अपूर्ण असल्याने पावसाचे जास्तीचे पाणी आडले जात आहे.अनेक छोटे पुल व नाल्या या राष्ट्रीय महामार्ग कामात भुजल्या व बंद झाल्या आहेत.
हेही वाचा :

लातूर : अहमदपूर-शिरूर राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक कोसळून युवक ठार
नांदेड : चॉकलेटचे अमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; नराधमास अटक
जळगाव: रशिया येथे नदीत बुडालेल्या अमळनेरच्या भावाबहिणीचे मृतदेह सापडले