आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घातक स्पेसबगचा लागला छडा

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घातक स्पेसबगचा लागला छडा

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि अन्य आठ क्रू सदस्यांसमोर एक समस्या निर्माण झाली आहे. या स्पेस स्टेशनमध्ये एक स्पेसबग लपला असल्याची माहिती समोर आली आहे. वैज्ञानिकांनी या ‘एंटेरोबॅक्टर बुगंडेंसिस’ नावाच्या अतिशय शक्तिशाली बॅक्टेरियाचा छडा लावला आहे, जो स्पेस स्टेशनच्या बंद वातावरणातच विकसित झाला आहे. हा जीवाणू सातत्याने शक्तिशाली बनत असून, त्याने औषधांविरुद्ध स्वतःमध्ये प्रतिकार शक्तीही निर्माण केली आहे. त्यामुळेच त्याला ‘सुपरबग’ म्हटले जात आहे. हा स्पेसबग माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो.
असे स्पेसबग अंतराळातून नव्हे, तर पृथ्वीवरूनच अंतराळवीर किंवा साहित्यांमधून स्पेस स्टेशनवर येऊ शकतात. सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बॅरी यूजीन बूच विल्मोर अनेक वेळा उड्डाण प्रलंबित पडल्यानंतर अखेर 6 जूनला नव्या बोईंग स्टारलायनर अंतराळ यानातून ‘आयएसएस’वर पोहोचले होते. सुनीता या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा अधिक काळ राहण्याची शक्यता आहे.
कू्रमधील अन्य सदस्य दीर्घकाळापासून आयएसएसवर राहत आहेत. सर्वसाधारणपणे स्पेस स्टेशनवर राहत असलेल्या अंतराळवीरांना अंतराळातील कचरा किंवा छोट्या उल्का, लघुग्रह आदींचा धोका असतो. मात्र आता या स्पेसबगने समस्या निर्माण केली आहे. याबाबत ‘नासा’ने सांगितले, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून वेगळ्या केलेल्या ‘ई-बुगंडेंसिस’ या बॅक्टेरियाच्या नव्या प्रजातीचे अध्ययन करण्यात आले. औषधरोधी अशा या बॅक्टेरियाच्या 13 सब व्हेरिएंटस्चा छडा लावण्यात आला. तणावाच्या काळात या बॅक्टेरियाच्या सब व्हेरिएंटस्मध्ये म्युटेशन आढळून आले. ते पृथ्वीवरील अशा बॅक्टेरियांपेक्षा अनुवंशाने व व्यवहाराने वेगळे झाले. या सब व्हेरिएंटस्मध्ये आयएसएसवर दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता दिसून आली.