अमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज

अमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज (दि. ५) सायंकाळी ६.३० सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे. या सभेनिमित्ताने ते सोमवारी रात्री १०.१० वाजता त्यांचे शहरात दाखल झाले असून जिल्ह्यात ही त्यांची पहिलीच सभा आहे. याच सभेतून भाजप राज्यातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. दरम्यान, या सभेसाठी राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले सांस्कृतिक मैदान शहा यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
राज्यात लोकसभा निवडणूकीदृष्टीने भारतीय जनता पार्टीची पहिलीच सभा छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर होत आहे. या सभेस भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार अशोक चव्हाण, आमदार हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब यांच्यासह प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
भाजपने राज्यात लोकसभा निवडणूकीचे १२ क्लस्टर तयार केले आहेत. त्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहमदनगर हे एक क्लस्टर आहे. या क्लस्टरसाठी आजची ही सभा सांस्कृतिक मैदानावर होत आहे. सांस्कृतिक मैदान हे राजकीय सभांच्या दृष्टीने ऐतिहासिक मैदान आहे. त्यामुळे या सभेसह मैदानावर नेमकी किती गर्दी होणार याकडेच विरोधकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभेनिमित्ताने शहरातील संपूर्ण रस्त्यांवर शहा यांच्या स्वागताचे पोस्टर, होर्डींग झळकत आहेत. त्यासोबतच सभा स्थळापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजपचे झेंडेही लावण्यात आल्याने शहर भाजपमय झाले आहे.
सभेला जाण्यापूर्वी शिवरायांना वंदन
सांस्कृतिक मैदानावरील सभेला हजेरी लावण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वप्रथम क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला पु्ष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत. त्यानंतर ते सभास्थळाकडे रवाना होणार आहेत.
Latest Marathi News अमित शहा यांची आज सभा; संपूर्ण शहर भाजपमय, सांस्कृतिक मैदान सज्ज Brought to You By : Bharat Live News Media.