टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तासगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला पाणीटंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत. या भागातील टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार सुमनताई आर आर पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी सोमवारी (दि. ४) जिल्हाधिकारी एम राजा दयानिधी यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये कृष्णा नदीवर खोडशी बंधारा आहे. खोडशी बंधाऱ्याचे लाभक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड तर सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगांव तालुक्यातील आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास १३.५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत.
उच्च न्यायालयाच्या सन २००४ मधील आदेश नुसार या कालव्याकरीता खोडशी बंधाऱ्यावरील सातारा जिल्ह्यात असणाऱ्या प्रकल्पामधून वार्षिक २.७० टी. एम. सी. एवढे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. यावर्षी कृष्णा नदीतील उपलब्ध पाण्यामधुन खरीप व रब्बी मधील आवर्तन जेमतेम करण्यात आलेले आहे.
सध्याच्या उन्हाळी हंगामामध्ये या चार तालुक्यातील लाभक्षेत्रात टंचाई असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या नात्याने आपण सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधावा आणि तारळी धरणातून टंचाई अंतर्गत सोडणेबाबत नियोजन करावे.
सिंचन योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरु करा : आ. सुमनताई
आमदार सुमनताई यांनी लेखी पत्राद्वारे दुष्काळी टापूतील शेती वाचविण्यासाठी सिंचन योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरु करावे अशी मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे. वारणा आणि कृष्णा नदीतील उपलब्ध पाण्यातून खरीप व रब्बी हंगामी पिकांसाठी ताकारी, आरफळ, म्हैसाळ व टेंभू या चारही योजनेतून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांसाठी पाणी दिले जाते. पण चारही योजनेतून अजून उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरु झालेले नाही. आवर्तन लवकर सुरु झाले नाही तर शेतकऱ्यांना द्राक्ष बागा तोडून टाकाव्या लागतील अशी स्थिती आहे. याची गांभिर्याने दखल घ्यावी.
Latest Marathi News टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Brought to You By : Bharat Live News Media.