सर्व भारतीय सैनिक मालदीवमधून माघारी

सर्व भारतीय सैनिक मालदीवमधून माघारी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
वृत्तसंस्था/ माले, नवी दिल्ली
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक मायदेशी परतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मालदीवने सर्व भारतीय सैनिकांना माघारी बोलावण्याची सूचना केल्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयानेही सर्व सैनिकांच्या माघारीला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुद्यावर मालदीवशी झालेल्या चर्चेनंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आता सैनिकांचे कामकाज हाताळण्यासाठी नागरी तांत्रिक कर्मचारी पाठवण्यात आले आहेत.
मालदीवचे परराष्ट्रमंत्री मुसा जमीर एक दिवसीय भारत दौऱ्यावर असताना ही घोषणा करण्यात आली. भारतीय सैनिकांच्या माघारीवर ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य केवळ सैनिकांच्या उपस्थितीवर अवलंबून नाही. जी जबाबदारी भारतीय जवानांवर होती ती आता नागरिक पार पाडतील. भारत, मालदीव आणि श्रीलंकेचे सैन्य एकत्रितपणे सराव करतात. ही मोहीम भविष्यातही चालू राहील, असे मुसा जमीर यांनी सांगितले.
भारताने मालदीवला भेट दिलेल्या दोन हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे ऑपरेशन 88 भारतीय सैनिकांनी हाताळले. ही यंत्रणा बचाव किंवा सरकारी कामांमध्ये वापरली जाते. 2010 आणि 2013 मध्ये दोन्ही हेलिकॉप्टर मालदीवला देण्यात आली होती, तर विमान 2020 मध्ये देण्यात आले होते.