सोने तस्करीचा आफ्रिकन शिक्का !

सोने तस्करीचा आफ्रिकन शिक्का !

1960 च्या दशकांत हाजी मस्तान-युसूफ पटेल या तस्करांनी मुंबईच्या गोदीवर वर्चस्व निर्माण केले होते. इलेक्ट्रॉनिक वस्तूसह मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची तस्करी सुरू होती. कालांतराने गोदीची जागा विमानतळाने घेतली आणि तस्करांची जागा आफ्रिकन तस्करांनी घेतल्याने आज त्यांचाच शिक्का सुरू आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सोने तस्करीमध्येही आफ्रिकन देशांतील टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळते आहे. तेथे असणाऱ्या कमालीच्या गरिबीचा फायदा उचलून त्यांच्याकडून सोने तस्करी करण्यासारखे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. सोने पकडल्याच्या कितीतरी घटना देशभरातील विमानतळांवर अलीकडच्या काळात घडल्या आहेत.
70 च्या दशकापासूनच आखाती देशांतून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी व्हायची. सीमाशुल्क विभाग व महसुल गुप्तवार्ता संचलनालय(डीआरआय) सारख्या यंत्रणांच्या कारवाया वाढल्या. त्यामुळे थेट आखाती देशातून सोन्याची तस्करी करणे कठीण झाले. त्यानंतर तस्करांनी नवनवीन क्लुप्त्या वापरण्यास सुरूवात केली. नजिकच्या काळात सोने तस्करीसाठी म्यानमारचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या काही वर्षात तस्करीतील 37 टक्के सोने म्यानमार मार्गे भारतात आले होते, हेही दिसून आले आहे भारतात होणाऱ्या सोने तस्करीचे पेंद्र दुबई हे असल्याचे सांगितले जात आहे. गेले वर्षानुवर्षे भारतात दुबईतूनच सोन्याची तस्करी होत आहे. पण वर्षांनुवर्षे त्याच्या मार्गांमध्ये बदल होत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या या आंतरराष्ट्रीय टोळ्यामध्ये भारतीय तस्करांसह अनेक देशांतील टोळ्यांचा सक्रीय समावेश आहे, हेही आपण जाणतोच. देशातील महसूल गुप्तचर संचालनालयाने 2021-22 मध्ये तस्करीच्या माध्यमातून भारतात आलेले जितके सोने जप्त केले, त्यापैकी 37 टक्के सोने म्यानमारमधून भारतात आले होते. देशात जप्त करण्यात आलेल्या बेकायदेशीर सोन्यांपैकी 20 टक्के सोने मध्यपूर्वेतील आखाती देशांतून आले आहे. तस्करीचे 7 टक्के सोने बांगलादेशमार्गे भारतात पोहोचले असल्याचेही सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे 36 टक्के सोने इतर देशांतून तस्करीच्या माध्यमातून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पण गेल्या काही वर्षांपासून दिल्ली, मुंबई व कोलकाता येथील सोने तस्करी करणाऱ्या सिंडिकेटने आफ्रिकन टोळ्यांना हाताशी धरून तस्करी करण्यास सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियातून सोने दुबईला आयात केले जाते. हे सोने छुप्या पद्धतीने विविध देशांतून भारतात पाठवले जात आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील टोळ्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग बनून कोट्यावधींचा नफा कमवत आहेत.
मुंबईत छापा
नुकतीच डीआरआयने झवेरी बाजार येथे छापा टाकून साडे नऊ किलो तस्करीचे सोने, 18 किलो चांदी, सुमारे दोन कोटींची रोख आणि सुमारे दोन लाख अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 10 कोटी 48 लाख ऊपये आहे. सोने तस्करीप्रकरणी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन आफ्रिकन नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली होती. आफ्रिका खंडातून तस्करी केलेले सोने मुंबईतील झवेरी बाजार येथे आणून वितळवले जात असल्याची डीआरआयला माहिती मिळाली होती. आफ्रिकेतून तस्करी करून आणलेले सोने वितळवून त्यावरील परदेशी शिक्के काढून ते स्थानिक बाजारात विकले जात होते.
विमानळावर कारवाई
सोने तस्करीसंबंधातल्या अनेकविध घटना भारतात अलीकडच्या काळात घडत आलेल्या आहेत. विशेषत: विविध विमातनळांवर अशा प्रकारचे अवैध सोने जप्त करण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने 10 जूनला कारवाई करून दोन परदेशी महिलांकडून 32 किलो 790
ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 19 कोटी 15 लाख ऊपये आहे. अन्झल काला (27) व साईदा हुसैन (24) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. दोघीही केनिया देशाच्या रहिवासी आहेत. आरोपी महिलांनी त्यांच्याकडील बॅगमध्ये व अंतर्वस्त्रात सोने लपवले होते, असेही समजून आले आहे. तपासणीत एकीकडे 22 कॅरेट सोन्याचे 28 लगड सापडले, तर अन्य एका दुसऱ्या महिलेकडे 70 सोन्याचे लगड सापडले. अशा प्रकारे दोघींकडून मिळून एकूण 32 किलो 790 ग्रॅम सोने सापडले आहे.
कोण आहेत तस्करीत
सोने तस्करीसाठी आफ्रिकन टोळ्यांना हाताशी घेतले जात आहे. या टोळ्या त्यांच्या देशातील गरीब व गरजू व्यक्तींना हेरून त्यांच्यामार्फत सोन्याची तस्करी करत आहेत. त्या बदल्यात तस्करी करणाऱ्या व्यक्तींना छोटी रक्कम देऊन मोठा नफा या टोळ्या कमवत आहेत. एप्रिल महिन्यात झवेरी बाजार येथे केलेल्या कारवाईत आफ्रिकन देशातील टोळ्यांसोबत सोने तस्करीबाबत छुपा करार केला होता. त्या अंतर्गत दर महिन्यात एक ते दोनवेळा सोन्याची तस्करी केली जायची. हा सर्व व्यवहार अमेरिकनडॉलर्समध्ये होत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आरोपींकडून 90 हजार अमेरिकन डॉलर्सही जप्त केले होते. अंमली पदार्थाच्या तस्करी मक्तेदारी असलेल्या आफ्रिकन टोळ्यांनी सोने तस्करीतही हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. तुलनेने कमी जोखमीचे असलेल्या सोने तस्करीत पैसाही चांगला मिळतो. त्यामुळे आफ्रिकन देशातील गरीब नागरिकांकडून तस्करी केली जात आहे.
– अमोल राऊत