परिवहन महामंडळाला सुगीचे दिवस

परिवहन महामंडळाला सुगीचे दिवस

उन्हाळी हंगाम सुसाट : सुटी-लग्नसराईंमुळे प्रवासी संख्येत वाढ : उत्पन्न समाधानकारक
बेळगाव : लग्नसराई, यात्रा, जत्रा, पर्यटन आणि इतर कार्यक्रमांमुळे प्रवाशी संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नातही साहजीकच वाढ होऊ लागली आहे. उन्हाळी हंगाम हा परिवहनसाठी सुगीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे परिवहनला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. एप्रिल, मे महिन्यात यात्रा-जत्रा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असतो. त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्याबरोबर शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी असल्याने कुटुंबीयांसह बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसनाही गर्दी होऊ लागली आहे. परिणामी परिवहनचा दैनंदिन महसूलही समाधानकारक वाढू लागला आहे.
विविध मार्गांवर बसेस फुल
तालुक्यातील सांबरा, मणिकेरी गावच्या महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्याबरोबर लग्नसराई सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांनी गजबजू लागले आहे. विविध मार्गांवर बसेस फुल होऊन धावताना दिसत आहेत. त्यामुळे परिवहन उन्हाळी हंगामाची संधी साधत आहे. राज्यात 11 जून 2023 पासून शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. परिणामी महिला प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पुरुषांपेक्षा बसमध्ये महिलांची संख्या अधिक दिसून येत आहे. परिणामी विविध मार्गांवर बस अनियमित होऊ लागली आहे. बेळगाव विभागात बसेसची कमतरता आहे. अन्यथा यंदाच्या उन्हाळी हंगामात अधिक उत्पन्न मिळाले असते. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसेसवरच डोलारा सुरू आहे.
राज्यात बेळगाव विभागाचा महसूल सर्वाधिक
मध्यवर्ती बसस्थानकातून दैनंदिन 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. विशेषत: राज्यात बेळगाव विभागाचा महसूल सर्वाधिक आहे. बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून आहे. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे. बेळगाव विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न हे गोवा आणि महाराष्ट्रात धावणाऱ्या बसमधून प्राप्त होते. एप्रिल आणि मे महिन्यात विविध ठिकाणी फिरणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे बसस्थानकात बुकिंग करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. उन्हाळी सुटीमुळे कुटुंबासह ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिवहनला उन्हाळ्यात अतिरिक्त महसूल मिळू लागला आहे.
स्थानिक-लांबपल्ल्याच्या बसेसवर ताण
यात्रा-जत्रा, लग्नसराई आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक आणि लांबपल्ल्याच्या बसेसवर ताण वाढू लागला आहे. उन्हाळी हंगामातून अधिक उत्पन्नही प्राप्त होऊ लागले आहे. काही बसेसही बुकिंग केल्या जात आहेत.
– के. के. लमाणी (डीटीओ)