हलगा-मच्छे बायपासचे काम सुरूच

हलगा-मच्छे बायपासचे काम सुरूच

आता उच्च न्यायालयाकडे साऱ्यांचे लक्ष : 4 एप्रिल रोजी  सुनावणी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या सपाटीकरणाबरोबरच खडी टाकली जाणार आहे. सोमवारीही मोठ्या प्रमाणात खडी टाकण्यात येत होती. याचबरोबर त्याचे सपाटीकरणही करण्यात येत आहे. येळ्ळूर रस्त्यापासून अलारवाडपर्यंत रस्त्याचे सपाटीकरण पूर्ण झाले आहे. आता मच्छे गावाकडूनही रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या रस्त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या कामाला जोरदार सुरूवात केली आहे. येत्या दोन महिन्यात 60 टक्के काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराचे प्रयत्न सुरू आहेत. खडी टाकणे याचबरोबर पुलाच्या उभारणीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. येळ्ळूर, धामणे रस्त्यासह रेल्वे रुळाजवळही पुलांची उभारणी केली जाणार आहे. या कामाला अद्याप सुरूवात करण्यात आली नसली तरी लवकरच पुलाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
रस्त्याचा बासमतीचा पट्टा
अलारवाड ते मच्छे हा रस्ता सुपीक जमिनीतून होत असल्याने शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच विरोध केला होता. बासमतीचा पट्टा असलेल्या शिवारातून हा रस्ता केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन गमवावी लागणार आहे. एकूणच सुपीक जमीन नाहीशी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी याचिका
या रस्त्याच्या कामाला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली आहे. 4 एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे वकील उपस्थित राहणार का? हे पहावे लागणार आहे. अन्यथा न्यायालय पुन्हा पुढील तारीख देण्याची शक्यता आहे. काहीही असले तरी भूलथापांना बळी पडू नये., असे आवाहन शेतकरी संघटनेबरोबरच वकिलांनी केले आहे.