असह्या उकाड्यातही लईराईची श्रद्धा अपार

असह्या उकाड्यातही लईराईची श्रद्धा अपार

शिरगावात लईराईच्या भक्तांचा महापूर : देवीच्या नामाचा अखंडपणे गजर,जत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
डिचोली : असह्य उकाड्याची तमा न बाळगता देवी लईराईच्या अनंत श्र्रध्दा व प्रेमापोटी अंगाची लाहीलाही होत असतानाही हजारोंच्या संख्येने भाविक, भक्तांनी शिरगावात कार रविवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. श्री देवी लईराई माता की जयच्या अखंड गजरात देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीने गाव अगदी फुलून गेला होता. हातात रंगबिरंगी गोण्यांनी सजविलेली बेतकाठी घेऊन विविध रंगांची सोवळी परिधान केलेल्या धोंडगणांमुळे या जत्रोत्सवातील उत्साह ओसंडून वाहत होता. लईराई देवीचा जत्रोत्सव रविवारी आल्याने भाविक भक्तांसाठी ती एक पर्वणीच ठरली. सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने भाविकांनी शिरगावात उपस्थिती लावली होती. दुपारी 12 वा. च्या सुमारास मयेतील चौगुले मानकरी देवीस कवळास घेऊन आल्यानंतर खऱ्या अर्थाने जत्रोत्सवाला प्रारंभ झाला. ढोलावर काठी पडताच शिरगावातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले आणि धोंडगण हातातील वेतकाठी हवेत फिरवत मंडपात थिरकू लागले. दिवसभर लाखो लोकांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली, रात्री तर अक्षरश: भाविक भक्तांचा महापुरच आला होता. धोंडगण आणि लोकांच्या साक्षीने मंगळवारी पहाटे देवी आपल्या धोंडगणांसह अग्निदिव्य मार्गक्रमण करून आपला पण पूर्ण करणार आहे. नंतर चार दिवस कौलोत्सव चालणार आहे. देवीचा कळस शिरगावातील घरांच्या अंगणात जाऊन त्या घारातील कुटुंबियांना व लोकांनाही कौलप्रसाद देणार आहे.
कडक उन्हातही भक्तीचा महापूर
सकाळी देवीच्या मंदिरात विविध धार्मिक विधी झाल्या. देवीच्या कळसातील तीर्थ गावातील प्रत्येक घरामध्ये वितरीत करून गाव पवित्र आणि सुचिर्भूत करण्यात आला. दरवषीप्रमाणे असह्य कडक उकाड्यात उन्हाचे चटके अंगावर सोसत मोठ्या संख्येने महिला, वृध्द, तरूण याचबरोबर धोंडगणांनी उपस्थिती लावली होती.
साऱ्या वातावरणात मोगऱ्याचा दरवळ
या जत्रोत्सवात देवी लईराईला प्रिय असलेल्या मोगरीच्या कळ्यांच्या माळा हातात घेऊन देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मोगरीच्या कळ्यांची माळा विक्री करणाऱ्या महिला, पुरूष विव्रेत्यांचीही मोठी गर्दी होती. जत्रोत्सवात या मोगरीच्या कळ्यांना मोठी मागणी असल्याने या माळांच्या दरांमध्ये बरीच वाढ झाली होती. तरीही लोक व धोंडगण देवीच्या श्र्रध्देपोटी चढ्या दरानेही मोगरीच्या कळ्यांच्या माळा खरेदी करून देवीला अर्पण करीत होते.
कवळास येताच वातावरण चैतन्यमय
देवी लईराईला मये गावातून कवळास आल्यानंतर शिरगावातील जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. सकाळी साडेअकराच्या सुमारास मयेतील चौगुले मानकरी गावकरवाडा मये येथील महामायाच्या मंदिरात जमा झाले. मंदिरात देवीला सांगणे घातल्यानंतर देवीचा कळवास घेऊन चौगुले मानकरी शिरगाव येथे जाण्यास निघाले आणि ते दु. 12 वा. च्या सुमारास शिरगावातील मंदिरात दाखल होताच येथील वातावरणात चैतन्य निर्माण झाले. तोच ढोलावर काठी पडायला सुरूवात झाली आणि हातात वेतकाठी धरलेले सर्व धोंडगण मंडपात हर्रो.. हर्रो.. च्या गजरात थिरकू लागले.
देवीची चिरा मुड्डी येथे जाण्यास रवाना
शिरगाव येथील देवीचे चौगुले मानकरी यांनी देवीची उत्सवमूर्ती (चिरा) असलेली पेठ मंदिरात आणली. देवीच्या मंदिरात उत्सवमूर्ती सजविण्यात आल्यानंतर चिरा मोडाच्या डोक्मयावर स्वार करण्यात आली. देवीला गाराणे घालताच वाजत गाजत धोंडगणांच्या साथीने नाचत चिरा मुड्डी येथे जाण्यासाठी रवाना झाली. वाटेत असंख्य भाविकांनी चिराचे दर्शन घेतले.
हजारो धोंडगणांचे आगमन
चिरा मुड्डी येथे आपल्या आदिस्थानात दाखल झाल्यानंतर देवीचा मोठा जयघोष झाला. यानंतर सर्व धोंडगणांनी देवीच्या पवित्र तळीवर स्नान केले. यावषी धोंडगणांच्या तळीचे विस्तारीकरण करण्यात आल्याने धोंडगणांची चांगली सोय झाली. या कामामुळे धोंडगणांनी समाधान व्यक्त केले. येथे स्नान केल्यानंतर मुड्डी येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच होमकुंडाला प्रदक्षिणा मारल्या. मुड्डी येथे नव्यानेच धोंड म्हणून रूजू झालेल्या धोंडगणांना मानवून घेण्यात आले. सकाळीपासूनच राज्यातील विविध भागांमध्ये सोवळे व्रत पाळलेल्या असंख्य धोंडगणांनी शिरगावात उपस्थिती लावली होती. दुपारी वाजतगाजत आपल्या मूळ आदिस्थानात आणण्यात आलेली चिरा देवीची उत्सवमूर्ती रात्री 8.30 वा. च्या सुमारास मोडाच्या डोक्मयावर स्वार करून नाचत गाजत देवीच्या मुख्य मंदिरात आणण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. रात्री 11.30 वा. च्या सुमारास देवीचा मोगरीच्या कळ्यांनी सजविलेला कळस मोडपुरूषांच्या डोक्मयावर स्वार करण्यात आला. जत्रोत्सवाचे गाऱ्हाणे घातल्यानंतर धोंडगणांच्या वेतनृत्य आणि देवीच्या जयघोषात नाचत गाजत कळस मंदिरातून बाहेर काढण्यात आला. रात्री 12 वा. च्या सुमारास देवीचा कळस नाचत गाजत होमकुंडस्थळी दाखल होताच देवीच्या नामाचा मोठा गजर करण्यात आला. होमकुंडाला देवीने चंद्रज्योतीच्या सहाय्याने अग्नी दिला. होमकुंड पूर्णपणे पेट घेताच हा सारा परिसर प्रकाशमान झाला. लगेच देवी पवित्र तळीवर स्नानासाठी गेली. देवीच्या कळसात तीन ओंजळी तळीतील पाणी घालण्यात आले. समवेत असलेल्या मोडपुरूष व इतर चौगुले मानकऱ्यांनी स्नान केल्यानंतर कळस मुड्डी येथे मूळ आदिस्थानात गेला. देवीचा कळस मुड्डी येथे दाखल होऊन मंदिरात स्नानापन्न होताच शिरगावात दाखल झालेल्या लाखेंच्या संख्येने धोंडगणांनी पवित्र तळीत स्नान केले. स्नान करून धोंडगणांनी मुड्डी येथे देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. मुड्डी येथे देवीचे दर्शन घेतल्यावर या धोंडगणांना देवीचा प्रसाद म्हणजेच मोगऱ्याचा कळा देण्यात आला. तो कळा तोंडात धरून धोंडगण अग्निदिव्य पार करण्यासाठी रांगा करतात. पहाटे होमकुंडातील लाकडांचे निखारे झाल्यानंतर ते धगधगते निखारे एका बाजूला आणून त्यांचा थर तयार केला जातो. आणि या थरावरून सर्वप्रथम धोंडगण जातात.
 पहाटे देवी करणार आपला पण पूर्ण
पहाटे सर्व धोंडगणांनी होमकुंड अग्निदिव्य पार केल्यानंतर देवीचे चौगुले मानकरी होमकुंड पार करणार आणि त्यानंतर पहाटे देवीचा कळस धगधगत्या निखाऱ्यांवरून चालत जाऊन होमकुंड अग्निदिव्य पार करणार आणि आपल्या भावंडांसमोर केलेला पण पूर्ण करणार आहे. हा अपूर्व आणि सुवर्णमयी असा सोहळा पाहण्यासाठी शिरगावात मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती आहे. देवी आपल्या धोंडगणांसह अग्निदिव्य पार करणार आहे. त्यामुळे या पणाच्या पूर्ततेची उत्सुकताही तितकीच मोठी आहे. या जत्रोत्सवात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पर्येच्या आमदार देविया राणे, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व इतरांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. जत्रोत्सवात वाहतूक व्यवस्था चोख व्हावी यासाठी डिचोली वाहतूक पोलीस विभागातर्फे विशेष पोलीस चौकी साकारून त्याद्वारे जागृती करण्यात आली. भाविकांना आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी मंदिराच्या बाजूला व होमकुंड परिसरात तात्पुरते आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्याद्वारे लोकांना आरोग्य सेवा देण्यात आली. देवीने अग्निदिव्य पार केल्यानंतर कळस चव्हाटा येथे नेऊन ठेवला जाणार. तेथे लोक देवीच्या कळसाचे दर्शन घेतात. तर संध्याकाळी देवीचा कळस थेट मानसवाडा येथे नेण्यात येईल. तेथून देवीच्या कौलोत्सवाला प्रारंभ होणार आहे. शिरगावातील प्रत्येक घरांच्या अंगणात जाऊन देवी भाविकांना भेटी देणार आणि सेवा करून घेणार. प्रत्येक घरांमध्ये उपस्थित भाविक लोकांना देवी कौल देणार आहे. जत्रोत्सवानंतर सोम. दि. 13 मे ते गुरू. दि. 16 मे असे चार दिवस कौलोत्सव चालणार आहे. गुरूवारी रात्री विधीवतपणे देवीचा कळस मंदिरात दाखल झाल्यानंतर या पाच दिवशीय उत्सवाची सांगता होणार आहे.