गुंजेनहट्टी श्री होळी कामाण्णा यात्रोत्सवात वाहतूक कोंडी

गुंजेनहट्टी श्री होळी कामाण्णा यात्रोत्सवात वाहतूक कोंडी

वार्ताहर /कडोली
गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवात दुसऱ्या दिवशीही भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. धुलीवंदनानिमित्त परंपरेनुसार गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा देवालयाची यात्रा सोमवारपासून सुरू झाली आहे. यात्रेच्या पहिल्यादिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी मंगळवारी भाविकांची गर्दी अधिक झालेली दिसून आली आहे. पोलीस खात्याने मंगळवारी वाहनांच्या वाहतुकीमध्ये थोडीशी ढिलाई सोडल्याने दुपारी अचानक वाहतूक कोंडी होऊन भाविकांना त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीमध्ये भाविक दोन ते तीन तास अडकून पडले होते. तसेच दुपारच्या वेळेस वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाल्याने भाविकांत एकच तारांबळ उडाली. परंतु पावसाने थोडे आवरते घेतल्याने भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुंजेनहट्टी गावच्या सुमारे एक किलोमीटर परिसरात मोठ्या संख्येने भाविक थांबले होते. एखाद्या वेळेस वादळी वाऱ्यासह पाऊस आला असता तर भाविकांना मोठा त्रास झाला असता. वाहतुकीची कोंडी थोड्या प्रमाणात झाली असली तरी यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यास मदत झाली आहे.