पोतदार रॉयल्स सीसीआय, रोहन ट्रेडर्स विजयी

पोतदार रॉयल्स सीसीआय, रोहन ट्रेडर्स विजयी

युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा 
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून  पोतदार रॉयल्स सीसीआय संघाने भाटे वॉरियर्स संघाचा तर रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने सुपर एकसप्रेस युनियन जिमखाना संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले.  आदर्श हिरेमठ (पोतदार रॉयल्स) राहुल नाईक (रोहन ट्रेडर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या थरारक लढतीत पोतदार रॉयल्स संघाने भाटे वॉरिअर संघाचा केवळ 3 धावांनी पराभव केला. पोतदार रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 176 धावा केल्या. त्यात आदर्श हिरेमठने 7 षटकारांसह 79, अंगदराज हितलमनीने 2 षटकार 2 चौकारांसह 40 तर अमित यादवने 1 षटकार  3 चौकारांसह 32 धावांचे योगदान दिले. भाटेतर्फे हार्दिक ओझा व फरान पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भाटे वॉरियर्स संघाने 20 षटकात 8 गडी बाद 173 धावांपर्यंत मजल मारली. त्यात राहुल वेर्णेकरने 3 षटकार 4 चौकारांसह 52, माजी मकानदारने 31 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 61, अमेय भातकांडेने 1 षटकार 4 चौकारासह 29 धावा केल्या. पोतदारतर्फे स्वयम आपण्णावर, आदर्श हिरेमठ व अंगदराज हितलमनी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर या सामन्यात भाटे वॉरियर्स संघाचे चार फलंदाज धावबाद झाले.
दुसऱ्या सामन्यात रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा 41 धावांनी पराभव केला. रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 182 धावा केल्या. त्यात रोहन ट्रेडर्स बीएससी संघाची धावसंख्या एक वेळी 4 बाद 26 अशी नाजूक स्थिती असताना अनुभवी राहुल नाईक यांनी चौफेर टोलेबाजी करताना फक्त 30 चेंडूत 6 चौकार 6 षटकारांसह 71 धावा झोडपल्या. त्याला आकाश कटांबळे 2 षटकार 2 चौकारांसह 30, सौरव सावंतने 3 षटकार 2 चैकारांसह 36 व कृष्णा बागडेने 23 धावांचे योगदान देत सुरेख साथ दिली. सुपर एक्सप्रेस संघातर्फे दीपक नार्वेकरने किफायतशीर गोलंदाजी करताना 4 षटकात फक्त 11 धावा देत 4 गडी बाद केले. पार्थ पाटीलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सुपर एक्सप्रेसचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्यामुळे 20 षटकात 8 गडी बाद 141 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यात शिवप्रकाश हिरेमठने 31, संतोष चव्हाणने 26, तर विनोद देवडीगाने 18 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स बीएससी तर्फे यश हावळाण्णाचे व अक्षय पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे मोहम्मद ताहीर सराफ, समीर किल्लेदार व चंदन कुंदरनाड यांच्या हस्ते सामनावीर आदर्श हिरेमठ, इम्पॅक्ट खेळाडू माजिद मकानदार यांना बक्षीस देण्यात आले. दुसऱ्या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कर्ते प्रमोद कदम, अभिषेक चव्हाण व संतोष यादव यांच्या हस्ते सामनावीर राहुल नाईक व इम्पॅक्ट खेळाडू दीपक नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.