कॅनडात दहशतवादाला थारा नाही

कॅनडात दहशतवादाला थारा नाही

वृत्तसंस्था / ओटावा
हिंसाचार आणि दहशतवादाला कॅनडात कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन कॅनडाचे मंत्री डोमिनिक ए. लेब्लांक यांनी केले आहे. कॅनडातील शहर व्हॅक्यूव्हर येथे काही खलिस्तानवादी हस्तकांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येचे दृष्य एका कार्यक्रमात साकारले होते. त्यासंदर्भात ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे दृष्य कॅनडातील खलिस्तान्यांनी एका कार्यक्रमात साकारले होते. कॅनडातील हिंदू जनता आणि हिंदू उमदेवारा यांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे दृष्ट साकारण्यात आले आहे, असा आरोप त्या देशातील अनेक भारतीय आणि हिंदू वंशाच्या उमेदवारांनी केला आहे. त्या आरोपाच्या संदर्भात लेब्लांक त्यांची प्रतिक्रिया देत होते. कॅनडा सरकार अतिरेक्यांच्या विरोधात योग्य ती पावले उचलत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
चंद्रा आर्य यांचा आरोप
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी केली होती. या अंगरक्षकांचा संबंध शीख दहशतवाद्यांशी होता. कॅनडामध्ये अनेक शीख दहशदवादी संघटना आहेत. भारताचा पंजाब प्रांत भारतापासून तोडणे आणि स्वतंत्र खलिस्तानची निर्मिती करणे, हे या दहशतवादी संघटनांचे प्रमुख ध्येय आहे. या संघटना कॅनडातील हिंदू जनतेच्या मनात आजही भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्या देशातील हिंदू उमेदवार चंद्रा आर्य यांचा आहे.
भारत-कॅनडा वाद
कॅनडा देश तेथील शीख दहशतवाद्यांच्या विरोधात बोटचेपे धोरण स्वीकारत आहे, असा आरोप भारताने अनेकदा केले आहे. तसेच शीख दहशतवाद्यांच्या कारवाया त्या देशाच्या ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली कॅनडा सरकार या दहशतवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. कॅनडा हा गेल्या 40 वर्षांच्या कालावधीत कॅनडा हा देश शीख दहशतवाद्यांचे महत्वाचे आश्रयस्थान बनला आहे.
हिंदूना देश सोडण्याच आवाहन
कॅनडातील शीख दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याने काही महिन्यांपूर्वी कॅनडातील हिंदूंना देश सोडून जाण्याचे आवाहन केले होते. तसे न केल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याची धमकीही त्याने त्याच्या वक्तव्यात दिली होती.