पाक दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त

पाक दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त

वृत्तसंस्था / श्रीनगर
पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दोन दशहतवाद्यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हे दहशतवादी पाकिस्तानात वास्तव्याला असून तेथून भारतातील दहशतवादी कारवायांचे सूत्रसंचालन करीत आहेत. ते मूळचे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लाचे असल्याची माहिती देण्यात आली. जलील अहमद राठेर आणि मोहम्मद अश्रफ मीर अशी त्यांची नावे आहेत.
बारामुल्ला येथील जिल्हा न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पोलिसांनी मालमत्ता जप्त करण्याच्या कृतीला प्रारंभ केला. या दहशतवाद्यांची अनेक कोटी रुपयांची जमीन, भूखंड, घरे आणि इतर स्थावर मालमत्ता आता पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या दहशतवाद्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता. बऱ्याच काळापासून हे दहशतवादी पोलिसांना हवे आहेत.