दहा केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य आज ठरणार

दहा केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य आज ठरणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. मध्य आणि उत्तर कर्नाटकातील 14, महाराष्ट्रातील 11, गुजरातच्या 25, उत्तर प्रदेशच्या 10, मध्यप्रदेशच्या 9, आसामच्या 4, गोव्याच्या सर्व 2, छत्तीसगडच्या 7, बिहारच्या 5, पश्चिम बंगालच्या 4, दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या 1 आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या 1 अशा एकंदर 93 जागांवर मतदान या टप्प्यात होत आहे. गुजरातमध्ये 26 जागा आहेत. मात्र, सुरत मतदारसंघातील जागा भारतीय जनता पक्षाने निर्विरोध जिंकल्याने तेथे मतदान घेण्याची आवश्यकता उरलेली नाही. या टप्प्यात 10 केंद्रीय मंत्री आणि 4 माजी मुख्यमंत्री यांचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे. हा आणि यापुढचे सर्व चार टप्पे हे केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षासाठी, तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कारण या पाचही टप्प्यांमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वाधिक यश मिळाले होते. तसेच या टप्प्यासमवेत अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदान प्रक्रिया संपणारही आहे. त्यानंतर केवळ मतगणना आणि परिणाम यांची प्रतीक्षा राहणार आहे. तेव्हा सत्ताधाऱ्यांसाठी या तसेच पुढच्या टप्प्यांमध्ये अग्निपरीक्षेचा काळच असणार हे निश्चित आहे. विरोधी पक्षही या पाच टप्प्यांमध्ये त्यांच्या जागांमध्ये वाढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. तेव्हा त्यांच्या प्रयत्नांचीही कसोटी या टप्प्यात लागणार आहे…
कोणाचा विजय, कोणाचे राज्य…
कर्नाटक
2019 मध्ये मध्य आणि उत्तर कर्नाटकातील सर्व 14 जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला होता. तसेच 54 टक्के मतेही मिळविली होती. त्यावेळी काँग्रेसची युती निधर्मी जनता दलाशी होती. तसेच कर्नाटकात निधर्मी जनता दल आणि काँग्रेसची संयुक्त सत्ताही होती. आता कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे, तर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष आणि निधर्मी जनता दलाची युती आहे. या सर्व पक्षांच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील या टप्प्यातील 11 जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. 2019 मध्ये त्यांच्यापैकी बारामती, सातारा आणि शिरुर या तीन जागा वगळता उरलेल्या सर्व 8 जागा भारतीय जनता पक्ष आणि एकत्र शिवसेना यांच्या  युतीने जिंकलेल्या होत्या. मात्र, आता शिवसेना फुटल्याने समीकरणांमध्ये परिवर्तन होणार का, हा प्रश्न आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचेच राज्य होते. 11 जागांवर युतीला 48 टक्के मते मिळाली होती.
मध्यप्रदेश
2019 मध्ये मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे राज्य होते. पण लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश भारतीय जनता पक्षाने मिळविले होते. या टप्प्यात मतदान होत असलेल्या सर्व 9 जागा त्यावेळी भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या होत्या. तसेच या पक्षाला या जागांवर 56 टक्के मते मिळाली होती. आता या राज्यात भारतीय जनता पक्षाचेच दोन तृतियांश बहुमताचे राज्य आहे. यंदाही मागच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी हा पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे.
बिहार
या टप्प्यात मतदान होत असलेल्या सर्व पाच जागा 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या होत्या आणि या जागांवर 52 टक्के मतांची प्राप्ती केली होती. त्यावेळी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच राज्य होते. आताही या राज्यात याच आघाडीचे राज्य आहे. तसेच या आघाडीचा संघर्षही मागच्यावेळप्रमाणे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस युतीशी आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांसाठी या पाच जागा महत्वाच्या आहेत.
पश्चिम बंगाल
या राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील चार जागा या मध्य पश्चिम बंगालमधील आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी 3 जागा भारतीय जनता पक्षाने, तर दोन जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे राज्य येथे होते. आताही याच पक्षाच्या हाती राज्याची सत्ता आहे. त्यामुळे सत्तेच्या दृष्टीने राजकीय परिस्थिती समान आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न यंदा या राज्यातील जागा वाढविण्याचा असल्याचे दिसते.
उत्तर प्रदेश
या राज्यातील 10 जागांवर या टप्प्यात मतदान होत आहे. या जागा मध्य उत्तर प्रदेशातल्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी 8 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. तर 2 जागा समाजवादी पक्ष आणि 1 जागा बहुजन समाज पक्षाला मिळाली होती. 2019 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. पण समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती होती. यावेळी अशी युती या राज्यात झालेली नाही.
छत्तीसगड
या राज्यात 11 जागा असून त्यांच्यापैकी चार जागांवर यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये मतदान झालेले आहे. आता ऊर्वरित 7 जागांवर मतदान होत असून या जागा राज्याच्या मध्य आणि उत्तर भागांमध्ये आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. तरीही भारतीय जनता पक्षाने 7 पैकी सर्व 7 जागा जिंकल्या होत्या. आता राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून सर्व 11 जागा जिंकण्याचा या पक्षाचा प्रयत्न दिसून येतो.
आसाम
या राज्यात लोकसभेच्या 14 जागा असून त्यांच्यापैकी 10 जागांवर मागच्या दोन टप्प्यांमध्ये मतदान झालेले आहे. तिसऱ्या टप्प्यात ऊर्वरित 4 जागांवर मतदान होत असून त्या उत्तर दक्षिण आसाममधील आहेत. 2019 मध्ये आसाममध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य होते. या चारपैकी 2 जागा भारतीय जनता पक्षाने, 1 काँग्रेसने तर 1 एआययुडीएफने जिंकली होती. यंदाही या चारही जागांवर चुरशीची लढत होणे शक्य आहे.