राजीनाम्याच्या वृत्ताचा सुरेश गोपी यांचा इन्कार

राजीनाम्याच्या वृत्ताचा सुरेश गोपी यांचा इन्कार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केरळमधील भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी यांना केंद्रीय मंत्रिपद नको असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यांना लवकरच मंत्रिमंडळातून मुक्त केले जाऊ शकते, अशी चर्चा असतानाच गोपी यांनी स्वत:च राजीनाम्याच्या वृत्ताचा व अफवांबाबत इन्कार केला आहे. ‘मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कायम राहणार आहे. मी राजीनामा देणार असल्याच्या चुकीच्या बातम्या काही मीडिया प्लॅटफॉर्म पसरवत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपने आपले खाते उघडले असून शपथविधी सोहळ्यात सुरेश गोपी यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. 2024 च्या संसदीय निवडणुकीत त्रिशूर मतदारसंघातून गोपी यांनी विजय मिळवत केरळमधील भाजपचे पहिले लोकसभा खासदार म्हणून इतिहास रचला. निवडणुकीदरम्यान केरळसाठी आश्वासन (मोदींची हमी) दिल्यानंतर सुरेश गोपी मुख्य चेहरा बनले. 65 वषीय अभिनेत्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वकील आणि सीपीएम उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा 74,686 मतांनी पराभव करून त्रिशूर संसदीय जागा जिंकली.