मूल्यांकन परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीला वेग

मूल्यांकन परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीला वेग

दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता, निकालही लवकरच
बेळगाव : आठवी व नववी मूल्यांकन परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मराठी विभागाच्या उत्तरपत्रिका तपासणी मंगळवारपर्यंत पूर्ण होणार असून कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका गुरुवारपर्यंत तपासून पूर्ण होतील. 10 एप्रिलपूर्वी निकाल देण्यासाठी शिक्षण विभागाची तयारी सुरू आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून राज्यात पाचवी, आठवी व नववी या तीन वर्गांच्या मूल्यांकन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मार्च 11 पासून परीक्षांना सुरुवातही झाली. परंतु, परीक्षांवर आक्षेप घेण्यात आल्याने न्यायालयाने स्थगिती दिली होती. स्थगिती उठल्यानंतर 25 मार्चपासून परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा संपताच मूल्यमापनाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दोन दिवसांत पाचवीच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण करण्यात आल्या. मात्र, आठवी व नववी या दोन वर्गांच्या उत्तरपत्रिका अधिक असल्यामुळे विलंब होत आहे. बेळगाव शहरातील मराठी माध्यमाच्या 16 हजार उत्तरपत्रिका, कन्नड माध्यमाच्या 31 हजार, इंग्रजी माध्यमाच्या 49 हजार तर उर्दू माध्यमाच्या 8 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहेत. यापैकी उर्दू माध्यमाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
माध्यमनिहाय शहरातील आठवी-नववी उत्तरपत्रिकांची संख्या

मराठी      16 हजार
कन्नड       31 हजार
इंग्रजी       49 हजार
उर्दू          8 हजार

वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न
मूल्यांकन परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. पाचवीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले असून आठवी व नववीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे.
-आय. डी. हिरेमठ (सीआरसी बेळगाव शहर)