आधी होते चार; आता दोन बंबांवरच भार

आधी होते चार; आता दोन बंबांवरच भार

अग्निशमन ताफ्यात बंबांची कमतरता : मोठी दुर्घटना घडल्यास परिस्थिती कठीण
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्याचा विस्तार झपाट्याने होत असताना दुसरीकडे मात्र त्या मानाने सुरक्षेच्या सेवा देण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरत आहे. चार अग्निशमन बंबांपैकी केवळ दोन अग्निशमन बंब सध्या सेवेत असून मोठी दुर्घटना घडल्यास मोठे परिणाम होऊ शकतात. शहर व तालुक्याला केवळ दोन अग्निशमन बंबांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सरकारकडून अत्याधुनिक यंत्रणा असणारे अग्निशमन बंब बेळगावला देणे गरजेचे आहे. गोवावेस येथील अग्निशमन केंद्रांतर्गत बेळगाव शहरासह तालुक्याचा संपूर्ण भाग येतो. आजूबाजूच्या 25 किलोमीटरची हद्द अग्निशमन विभागाकडे येत असल्याने विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. बेळगाव शहर व तालुक्यांतर्गत उद्यमबाग, होनगा, ऑटोनगर या औद्योगिक वसाहती येत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे.
यापूर्वी अग्निशमन केंद्रामध्ये चार अग्निशमन बंब कार्यरत होते. त्यामध्ये 4,500 लिटर क्षमतेचे तीन तर 9 हजार लिटर क्षमतेचा एक बंब कार्यरत होता. त्यामुळे एकाचवेळी दोन ते तीन ठिकाणी आग लागली तरी ती नियंत्रणात आणणे शक्य होत होते. परंतु, केंद्र सरकारने पंधरा वर्षांवरील जुनी वाहने वापरता येणार नाहीत, असा नियम केल्याने यापैकी दोन अग्निशमन बंब वापराविना पडून आहेत. केवळ 4,500 लिटर पाण्याची क्षमता असणारे दोन अग्निशमन बंबांवर आग विझवावी लागत आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक ठिकाणी आग लागल्यास बचावकार्यात अडथळे येत आहेत. 2022 मध्ये बचावकार्यासाठी 299 फोन आले होते. तर 2024 मध्ये 31 मार्चपर्यंत 112 फोनची नोंद करण्यात आली आहे. बेळगावला मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख नेते, केंद्रातील नेते वारंवार येत असल्यामुळे त्यांच्या ताफ्यामध्ये अग्निशमन बंब तैनात करावा लागतो. त्यामुळे दोनपैकी एक बंब सुरक्षा यंत्रणेत गुंतल्याने केवळ एकाच अग्निशमन बंबावर काम करावे लागते. त्यामुळे अजून दोन वाहनांची गरज निर्माण झाली आहे.
सरकारकडे अधिक बंबांची मागणी
बेळगाव अग्निशमन केंद्रातील दोन अग्निशमन बंब वापरातून बाद ठरल्याने इतर दोन बंबांचा वापर केला जात आहे. एकाचवेळी 2 किंवा अधिक ठिकाणी मोठी आगीची घटना घडल्यास त्या विझविण्यासाठी हत्तरगी, हुक्केरी, खानापूर किंवा बैलहोंगल येथील अग्निशमन बंब मागवून घ्यावे लागतात. त्यामुळे सरकारकडे अधिक बंबांची मागणी करण्यात आली आहे.
-शशीधर निलगार (जिल्हा अग्निशमन अधिकारी)