ग्रा.पं.पातळीवर आपत्ती निवारण प्राधिकारची बैठक घ्या

ग्रा.पं.पातळीवर आपत्ती निवारण प्राधिकारची बैठक घ्या

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी ग्रा. पं. पातळीवर प्रत्येक महिन्यात आपत्ती निवारण प्राधिकारची बैठक घेण्याची सक्ती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी जिल्हास्तरीय आपत्ती निवारण प्राधिकार सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.संभाव्य पूरस्थितीचा समर्थपणे सामना करण्यासाठी ग्रा. पं. पातळीवर टास्क फोर्सची नेमणूक केली आहे. सदर टास्कफोर्स समितीची बैठक घेणे आवश्यक आहे. नियमानुसार बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा,अशी सूचना केली.
संभाव्य पूरस्थिती उद्भवणाऱ्या ग्रा.पं.ची 15 दिवसांतून एकदा बैठक घ्यावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास तेथे ग्रा.पं.चे पात्र महत्त्वाचे आहे. यासाठी ग्रा.पं.ची बैठक घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रा.पं. व्याप्तीमधील निश्चित केलेल्या निवारा केंद्रांना अधिकाऱ्यांनी भेट देऊन सुविधांची पाहणी करावी. छायाचित्रासह तपशील द्यावा, अशी सूचना करून गो-शाळा संदर्भातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केली. पूरस्थितीदरम्यान संसर्गजन्य रोग नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवावा, असे सांगितले.पूरस्थिती निवारण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून सदर अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
मदत केंद्र प्रारंभ करण्यास सूचना
जिल्हा व तालुका केंद्रांमध्ये साहाय्यवाणी केंद्र 24 तास कार्यरत करावे. बेळगाव शहरात प्रत्येक वॉर्डामध्ये दहा जणांच्या पथकांची नियुक्ती करून त्यांची माहिती घ्यावी. शहरातील गटारींची स्वच्छता करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी ग्रा.पं.मध्ये टास्कफोर्स समितीची बैठक घेऊन नदीपात्राच्या व्याप्तीत येणाऱ्या गावांमध्ये पुरासंदर्भात आवश्यक खबरदारी घेण्यासाठी तयारी करण्यात येईल, यासाठी प्रात्यक्षिकेही केली जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी आदी उपस्थित होते.