जागतिक स्पर्धेसाठी सुरेश देवरमनी यांची निवड

जागतिक स्पर्धेसाठी सुरेश देवरमनी यांची निवड

राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य
बेळगाव : मुंबई येथे 43 व्या राष्ट्रीय मास्टर अॅथलेटिक्स स्पर्धेत बेळगावचे वयस्कर धावपटू सुरेश देवरमनी यांनी 3 सुवर्ण व 2 रौप्यपदके पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. मुंबई येथील विद्याविहार येथील सोमय्या अॅथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित इंडिया मास्टर्स राष्ट्रीय वयस्करांच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतातून जवळपास 500 हून अधिक वयस्कर धावपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत बेळगावचे वयस्कर धावपटू सुरेश देवरमनी यांनी भाग घेतला होता. त्यांनी 70 वर्षावरील गटात 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत 3.25 इतक्या वेळेत पूर्ण करुन सुवर्ण, 1500 मी. धावण्याच्या स्पर्धेत 7.57 या वेळेत पूर्ण करुन सुवर्ण तर 5000 मी. धावण्याच्या स्पर्धेत 30.53 इतका वेळ घेत सुवर्णपदक तर 5000 मी. चालण्याच्या स्पर्धेत 38.23 इतक्या वेळेत पूर्ण करुन रौप्यपदक, 4×400 मी. रिले स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरेश देवरमनी यांनी आतापर्यंप विविध स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन करीत बेळगावचे नाव उज्वल केले आहे. 72 वर्षाच्या देवरमनी यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत तरुणाईला लाजविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. जुलै महिन्यात श्रीलंका येथे होणाऱ्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.