अव्वल खेळाडूंची परदेशात प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची विनंती मान्य

अव्वल खेळाडूंची परदेशात प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची विनंती मान्य

नवी दिल्ली/
बॉक्सर निखत झरीन, लांब उडीपटू मुरली श्रीशंकर आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा या ऑलिम्पिकमध्ये उतरणाऱ्या त्रिकुटासह अनेक अव्वल खेळाडूंनी परदेशात प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची केलेली विनंती क्रीडा मंत्रालयाने बुधवारी येथे झालेल्या बैठकीनंतर मंजूर केली. बॉक्सर निखत, प्रीती पवार, परवीन हुडा आणि लव्हलिना बोर्गेहेन या त्यांचे प्रशिक्षक आणि फिजिओसह परदेशी प्रशिक्षण शिबिरासाठी तुर्कीला जाणार आहेत, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
कुस्तीपटू सुजित (65 किलो), दीपक पुनिया (86 किलो) आणि नवीन (74 किलो) हे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या आधी प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचे सहकारी, प्रशिक्षक आणि फिजिओथेरेपिस्ट्ससह रशियाला जाणार आहेत. मंत्रालयाच्या ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’च्या अंतर्गत हे सर्व साहाय्य प्रदान केले जाणार आहे. शॉटगन नेमबाज भौनीश मेंदिरट्टा, ज्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे, तो बाकू येथील विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने प्रशिक्षण घेण्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षक डॅनिएल डी स्पिग्नो यांच्यासोबत इटलीला जाणार आहे.
आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील पदकविजेत्या श्रीशंकरचा दोहा व सुझोऊमधील डायमंड लीगमध्ये भाग घेण्याचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’च्या खाली श्रीशंकरचे प्रशिक्षक आणि मानसशास्त्रज्ञाचे विमान भाडे, बोर्डिंग/लॉजिंग खर्च, आऊट ऑफ पॉकेट अलावन्स, व्हिसा शुल्क आणि वैद्यकीय विमा खर्च यासह इतर खर्चाचा भार उचलला जाईल. भारताची अव्वल टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा हिला क्रोएशियातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. चेक प्रजासत्ताक येथील हॅविरोव येथे होणाऱ्या जागतिक मिश्र दुहेरी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेताना तिचे प्रशिक्षक अमन बालगू तिच्यासोबत असतील.
तीन नेमबाज अनंतजितसिंह नाऊका आणि रायजा धिल्लाँ (स्कीट) आणि राजेश्वरी कुमारी (ट्रॅप) तसेच पॅरा-बॅडमिंटनपटू पलक कोहली यांचाही या योजनेच्या कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.