वर्ल्ड कप वेटलिफ्टिंगमध्ये बिंदियाराणीला कांस्य

वर्ल्ड कप वेटलिफ्टिंगमध्ये बिंदियाराणीला कांस्य

वृत्तसंस्था/ फुकेत, थायलंड
राष्ट्रकुलमधील पदकविजेती वेटलिफ्टर बिंदियाराणी देवीने येथे सुरू असलेल्या आयडब्ल्यूएफ वर्ल्ड कप वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या 55 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले.
ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसलेल्या वजन गटात खेळताना 25 वर्षीय बिंदियाराणीने एकूण 196 किलो (83+113) वजन उचलत तिसरे स्थान मिळविले. मात्र 2022 मध्ये झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत तिने जबरदस्त कामगिरी करताना एकूण 203 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले होते. येथे मात्र तिला तशी कामगिरी करता आली नाही. तिला येथे सहापैकी तीन अधिकृत प्रयत्न करता आले आणि तिने सुवर्ण मिळविणाऱ्या उत्तर कोरियाच्या कांग ह्योन ग्याँगपेक्षा तब्बल 38 किलो कमी वजन उचलत तिसरे स्थान घेतले. ग्याँगने 234 (103+131) किलो वजत उचलत पहिले स्थान मिळविले. रोमानियाच्या कॅम्बेई मिहेला व्हॅलेन्टिनाने रौप्य मिळविताना एकूण 201 किलो वजन उचलले. बिंदियाराणीला 113 किलो वजन उचलल्याने क्लीन व जर्कमध्येही रौप्यपदक मिळाले.
खंडीय, वर्ल्ड कप्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप या स्पर्धांमध्ये स्नॅच, क्लीन-जर्क व एकूण अशा तीन विभागात पदके दिली जातात. ऑलिम्पिक पात्रतेच्या शेवटच्या स्पर्धेत पदक मिळविले असले तरी बिंदियाराणी ऑलिम्पिक पात्रतेतून बाहेर पडली आहे. ती याआधी 59 किलो वजन गटात खेळत होती. हा वजन गट ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट आहे. पण 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये तिला या गटात 25 वे स्थान मिळाले होते. नंतर पुन्हा एकदा वजन गट बदलून 55 किलो वजन गटातून खेळण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी तिने या प्रकारात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळविले होते. 59 किलो ऑलिम्पिक पात्रता मानांकनात सध्या ती 29 व्या स्थानावर असल्याने ती पात्रता शर्यतीतून बाहेर पडली आहे. कारण मानांकनातील फक्त टॉप 10 वेटलिफ्टर्सनाच ऑलिम्पिक पात्रता दिली जाते. ऑलिम्पिकमधील सर्व वजन गटासाठी हा नियम लागू आहे.