निवडणुकीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव

निवडणुकीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महानगरपालिकेतील कर्मचारी गुंतले आहेत.  निवडणुकीची विविध कागदपत्रे, पोस्टल मतदान पत्रिका यासह इतर कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. महानगरपालिकेतील सभागृहामध्ये ही कागदपत्रे जमा करून उत्तर व दक्षिण मतदारसंघातील मतदान केंद्रांवर पाठविली जाणार आहेत. त्या कामामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी गुंतले आहेत. विभाग प्रमुख गजानन कांबळे हे काळजीपूर्वक काम करत आहेत. शहरातील उत्तर विभागामध्ये एकूण 256 मतदान केंद्रे आहेत. तर दक्षिण विभागामध्ये 257 मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ही सर्व कागदपत्रे पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी महानगरपालिकेतील 14 कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. याचबरोबर त्यांच्यावर एका निवडणूक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. महानगरपालिकेतील दैनंदिन कामाबरोबरच निवडणुकीच्या कामाचा ताण आता या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. प्रशासनाकडून कागदपत्रे पाठविल्यानंतर त्याची योग्यप्रकारे जुळवाजुळव करून संबंधित मतदान केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत. 85 पेक्षा अधिक वयाच्या मतदारांना  घरामध्ये पोस्टल मतदानपत्रिका पोहोचविली जाणार आहे.