जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांकडून वाहन तपासणी

जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांकडून वाहन तपासणी

बाची चेकपोस्टवर पाहणी
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या व्याप्तीत येणाऱ्या विविध चेकपोस्टला जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनँग यांनी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या बाची चेकपोस्टवर काही काळ थांबून जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, काही चेकपोस्ट आंतरराज्य सीमेवर असल्याने या ठिकाणी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. अशा चेकपोस्टवर अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले. बेळगावच्या सीमा गोवा आणि महाराष्ट्र राज्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मद्य वाहतूक वाढली आहे. आदर्श आचारसंहिता जारी असल्याने बेकायदेशीररित्या रोख रक्कम वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी सांगितले. चेकपोस्टवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र गळ्यात घालणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनाच्या तपासणीची नोंद करून घेण्यात यावी. वाहन तपासणी करत असताना सौजन्यपूर्ण वर्तन असावे. अधिकाऱ्यांनी आपलीही काळजी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली.