कंग्राळी, अलतगा, गौंडवाड परिसराला पावसाचा दणका

कंग्राळी, अलतगा, गौंडवाड परिसराला पावसाचा दणका

वार्ताहर  /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड परिसरात शुक्रवार नक्षत्राच्या पावसाने सायंकाळी 7 वा. मुसळधार सलामी देऊन सर्वत्र पाणीच पाणी केले. त्यामुळे धूळवाफ भात पेरणी केलेल्या शेतकरी वर्गाला सदर पाऊस समाधानकारक ठरल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी पावसाने मान्सूनपूर्व अवकाळी पावसानेही चांगली साथ दिली. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने ही चांगली साथ दिल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना शेतकरी वर्गाला सोयीस्कर झाले होते. यामुळे मागील आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आयोजिली होती. कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द किर्यात परिसरात जवळजवळ 25 टक्के भात पेरणी तर जवळजवळ 75 टक्के भातरोप लागवड करण्यात येत आहे. भातपेरणीला भात उगवणी पासून शेतकरी वर्गाला कोळपणीनंतर पहिली भांगलण. नंतर दुसरी, तिसरी असे कायम कामातच रहावे लागते. परंतु रोप लागवड करून झाल्यावर गणेशचतुर्थीच्या तोंडावर एकदा भांगलण केल्यावर शेवटी भात कापणीलाच जावे लागते. त्यातच उत्पादन भरघोस तर शेतकरी वर्गाला काम कमी.. यामुळे भात रोप लागवड शेतकरी वर्गासाठी अधिक फायदेशीर असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
ऊस पिकाला पोषक पाऊस 
कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरमध्ये गेल्या दोन वर्षापासून ऊस लागवडीकडे चांगली ओढ झाल्याची दिसून येत आहे. ऊस पिकानाही प्रतिटनाला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग ऊस पिकाकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे.
भरघोस हिरवा चारा 
यावर्षी मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस आगाऊ झाल्यामुळे शेतकरी वर्गाला हिरवा चारा भरपूर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे जेंधळा पीक अजून शेतातच पडून असल्याचेही दिसून येत आहे. शेतातील बांधावर काँग्रेस गवताची भरपूर वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गासाठी सदर मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पोषक ठरल्याचेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.