आचारसंहिता संपली, नामफलक लागले

आचारसंहिता संपली, नामफलक लागले

महापौर-उपमहापौर यांना वाहनेही केली सुपूर्द
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर महापौर-उपमहापौर यांचे नामफलक काढून ठेवण्यात आले. याचबरोबर त्यांच्या कक्षाला कुलूपदेखील लावण्यात आला होता. वाहनेही जमा करून घेण्यात आली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी आचारसंहिता संपली असून शुक्रवारपासून महापौर-उपमहापौर यांना वाहने देण्यात आली तसेच त्यांच्या कक्षासमोर नामफलकही लावण्यात आले. भारतीय निवडणूक आयोगाने 16 मार्चपासून आचारसंहिता लागू केली होती. 6 जून रोजी संध्याकाळी आचारसंहिता संपली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचारसंहितेचे कोटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापौर-उपमहापौर, सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेत्यांच्या कक्षांना कुलूप लावले होते. याचबरोबर महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांची वाहनेही जमा करण्यात आली होती.
कक्ष झाले खुले
गुरुवारी सायंकाळी आचारसंहिता संपली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी महापौर-उपमहापौर यांना वाहने देण्यात आली. याचबरोबर नामफलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांसह साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. दोन्ही कक्ष यापूर्वीच खुले करण्यात आले तरी आचारसंहितेमुळे कोणत्याच प्रकारचे निर्णय तसेच बैठका घेण्यात आल्या नाहीत. मात्र आता आचारसंहिता संपल्यामुळे नगरसेवक, महापौर-उपमहापौर यांच्या कक्षामध्ये येऊन चर्चा करू लागले आहेत.